Khanapur Farmer Death
खानापूर : गवत आणण्यासाठी गेलेला शेतकरी गवताच्या गंजीवरून पाय घसरून खाली पडल्याने त्याच्या हातातील आकडी पोटात घुसून त्याचा मृत्यू झाल्याची घटना मोहिशेत (ता. खानापूर) येथे गुरुवारी सायंकाळी घडली आहे. कृष्णा गोविंद मिराशी (45) असे जीव गमावलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा मिराशी अन्य शेतकऱ्यांसोबत राघोबा आयकर यांच्या सर्वे नंबर 1 मधील शेतातील गवताची वाहतूक करण्याचे काम करत होते. सायंकाळी चहा पिण्यासाठी ते हातात आकडी धरून खाली उतरत होते. यावेळी अचानक तोल जाऊन पाय घसरून ते खाली कोसळले. त्यांच्या हातातील आकडीचे लोखंडी टोक त्यांच्या पोटात घुसले. त्यांना तत्काळ खानापूर सरकारी रूग्णालयात आणण्यात आले. तत्पूर्वी मोठा रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खानापूर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक एल. एच. गवंडी पुढील तपास करीत आहेत.