बेळगाव : कंग्राळी बुद्रुक येथील बंद घर फोडून चोरट्यांनी 12 तोळे सोन्याचे दागिने व सव्वाशे ग्रॅम चांदीच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. रेखा प्रवीण करतिप्पगोळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणाची काकती पोलिसांत नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महिला व तिचे वडील 19 डिसेंबररोजी घर बंद करून परगावी गेले होते. या काळात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममध्ये ठेवलेले सुमारे 12 तोळे सोन्याचे दागिने व 125 ग्रॅमच्या चांदीच्या वस्तू पळवून नेल्या. सोन्याच्या दागिन्यांमध्ये नेकलेस, ब्रेसलेट, अंगठ्या, मंगळसूत्र व कर्णफुले यांचा समावेश आहे. सोमवारी सायंकाळी जेव्हा हे कुटुंबीय घरी आले तेव्हा चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी काकती पोलिस ठाणे गाठून या प्रकरणाची फिर्याद दिली. काकतीचे निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी साडेपाच लाखांची घरफोडी अशी नोंद करून घेतली असली, तरी आजच्या बाजारभावानुसार दागिन्यांची किंमत बारा लाखांहून अधिक होते. श्वानपथकाला बोलावून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्यात यश आले नाही. ठसेतज्ज्ञांना पाचारण करून त्यांच्याकडूनही पुरावे जमवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला आहे. काकती पोलिसांनी नोंद करून घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.