बेळगाव

Belgaum Crime: कल्लेहोळमध्ये केबल चोरट्यांचा उच्छाद

आठवड्यात दुसऱ्यांदा प्रकार : १५ शेतकऱ्यांच्या कृषिपंपांच्या केबल लंपास

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : कल्लेहोळ शिवारात गुरुवारी (दि. ४) रात्री केबल चोरट्यांनी उच्छाद मांडला. तब्बल १५ शेतकऱ्यांच्या शिवारातील कृषिपंपांच्या केबल चोरण्यात आल्या. यामुळे या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

कल्लेहोळ शिवारात रविवारी (दि.३१) रात्री कृषिपंपाच्या केबलची चोरी झाली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री पुन्हा केबल चोरट्यांनी आपला मोर्चा कल्लेहोळ शिवाराकडे वळवत लाखो रुपयांच्या केबल लंपास केल्या. येथील दामाजी मरुचे, मारूती मरुचे, चाळोबा मरुचे, भरमाण्णा मरुचे, प्रसाद मरुचे, संजय मरुचे, भाऊराव पाटील, शिवाजी नागोजीचे, शिवाजी कितूर, विजय मरुचे, दिनकर राक्षे या शेतकऱ्यांच्या प्रत्येकी १५० फूट केबल लंपास करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून केबल चोरटे पश्चिम भागात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे, शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. त्याचवेळी चोरटे केबल लंपास करत असल्याने पिके सुकून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्यावेळी चोरटे केबल चोरत असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे. तालुक्यात केबल चोरीच्या घटना वाढूनही पोलिसांनी त्याकडे डोळेझाक चालविली आहे. यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक़्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT