बेळगाव : आजोबांच्या नावे असलेले वडिलोपार्जित घर व त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेची परस्पर विक्री झाल्याचा प्रकार तीन वर्षांनंतर उघडकीस आला आहे. कडोलकर गल्लीतील याप्रकरणी पाच जणांविरोधात खडेबाजार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
विमल दत्तात्रय गंधवाले (बेळगाव), भास्कर कोंडाजी दाभोळकर ऊर्फ रावळ, संगीता भास्कर दाभोळकर ऊर्फ रावळ, देवदत्त भास्कर दाभोळकर ऊर्फ रावळ (तिघेही रा. मुंबई) व ईश्वर विष्णुदास छप्रू (रा. सिंधी कॉलनी, हिंडलगा) अशी संशयितांची नावे आहेत.
नितीन श्रीपाद गंधवाले (वय 62, मूळ रा. कडोलकर गल्ली, सध्या रा. राजाजीनगर, बंगळूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार : आपले आजोबा दत्तात्रय गंधवाले यांच्या नावे कडोलकर गल्लीतील सीटीएस क्रमांक 1913/ए मध्ये 954 चौरस फूट जुने घर आहे. बाजूलाच सीटीएस क्रमांक 1960/1 आणि 2 मध्ये आणखी एक जुने घर आहे. ही दोन्ही घरे मूळ मालकाची संमती न घेता विमल गंधवाले यांनी उपरोक्त संशयितांना विकली आहेत.
तक्रारीनुसार पाचजणांवर फसवणूक व विश्वासघात केल्याचा गुन्हा खडेबाजार पोलिसांत दाखल झाला आहे. या व्यवहाराची स्टँम्प ड्युटी जिल्हा नोंदणी कार्यालयात भरली गेली आहे.
तक्रारदार सहा
तक्रारीवर नितीन गंधवाले यांच्यासह सुश्मा निजनंद रावळ (रा. भाग्यनगर),समा जयवंत रावळ (रा. मिरज, जि. सांगली), रूपा मनोज रावळ (पुणे), सतीश निवृत्ती गंधवाले (रा. कोल्हापूर) व मीना साजन रावळ (रा. कोल्हापूर) यांच्याही सह्या आहेत. खडेबाजार पोलिसांनी नोंद करून घेतली असून, निरीक्षक महांतेश धामण्णवर पुढील तपास करीत आहेत.