बेळगाव : मेट्रो शहरांत साचलेपण आले आहे. त्यामुळे सध्या द्वितीय श्रेणीतील शहरांकडे लक्ष आहे. बेळगावची प्रगती वेगाने होत असून गुंतवणूकदारांना पोषक वातावरण आहे. त्यामुळे क्रेडाईतर्फे आयोजित बेल्कॉन प्रदर्शन सर्वांसाठी फायदेशीर आहे, अशा भावना व्यक्त करत मान्यवरांनी गुरुवारी (दि. 5) सीपीएड मैदानावर बेल्कॉन 2026 गृहनिर्माण प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. हे प्रदर्शन 8 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. आमदार राजूसेट म्हणाले, शहरात मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर वेगाने विकास होतो. आम्ही या सुविधा पुरवत आहोत. त्यामुळे बेळगाव झपाट्याने विकसित होत आहे. सरकारच्या प्रयत्नांनी बेल्कॉनसारखे उपक्रम प्रोत्साहित करत असतात. अशा उपक्रमांना आमचा नेहमीच पाठिंबा असणार आहे. बांधकाम व्यावसायिकांनी सर्व नियम पाळले तर सरकार त्यांना आवश्यक सर्व मदत करण्यास तयार असते.
राहुल जारकीहोळी यांनी आयोजकांचे कौतुक केले. अशा प्रकारचे प्रदर्शन बंगळूर किंवा मुंबईत पाहायला मिळते. पण क्रेडाईने बेळगावातही अत्याधुनिक सुविधा असलेले आणि सर्व काही एका छताखाली असलेले प्रदर्शन भरविले आहे. बेळगावमधील वाढत्या उद्योगांना हे पोषक आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शहराच्या विकासासाठी उड्डाणपुलासह अनेक कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे या ठिकाणी गुंतवणुकीला आणखी वाव मिळणार आहे. लोकांनी या प्रदर्शनात विविध प्रकल्पांची माहिती घ्यावी, असे आवाहन केले.
आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी, गेल्या काही वर्षांत बेळगाव परिसरात विकासकामे होत आहेत. त्यामुळे जमिनीला भाव वाढला आहे. अजून रिंगरोड व इतर प्रकल्प पूर्ण झाले की बेळगाव गुंतवणुकीसाठी सर्वात महत्वाचे ठिकाण असणार आहे. गुंतवणूकदारांना पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगितले.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, क्रेडाई कर्नाटक अध्यक्ष भास्कर नागेंद्रप्पा यांनीही मनोगतात बेल्कॉनचे कौतुक केले. अध्यक्ष युवराज हुलजी यांनी आपण सर्वांनी मिळून हा उपक्रम यशस्वी करू, यापुढेही असे उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले. इव्हेंट चेअरमन प्रशांत वांडकर यांनी प्रास्ताविकात शहराच्या संपूर्ण विकासासाठी बेल्कॉन प्रदर्शन महत्वाचे आहे, हे नमूद केले. व्यासपीठावर यश इव्हेंटचे प्रकाश कालकुंद्रीकर, अभिषेक मुतगेकर, करुणा हिरेमठ, आनंद कुलकर्णी, सुधीर पनोरे उपस्थित होते. हर्षल कलघटगी यांनी सूत्रसंचालन केले..