Fraud Pudhari
बेळगाव

Belgaum Fraud Case: जादा परताव्याचे आमिष; अडीच कोटींची फसवणूक

दोन संस्थांसह दोघांविरोधात गुन्हा : शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याचे सांगत उडवाउडवी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : गुंतवणुकीवर दरमहा पावणेदोन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत आपल्यासह अनेकांची सुमारे २ कोटी ६० लाख ६० हजार ९९७ रुपयांची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद मंजुनाथ दिवाकर रायबागी (रा. आनंदनगर, दुसरा क्रॉस, वडगाव) यांनी शहापूर पोलिसांत दिली आहे. त्यानुसार दोन संस्थांसह दोघांविरोधात बुधवारी (दि. २२) दुपारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

विनायक महादेव भंडारे (मूळ रा. चिकोडी, सध्या रा. मारुती गल्ली, खासबाग) व अमोल पाटील (रा. गोंधळी गल्ली, बेळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. मंजुनाथ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विनायक भंडारेने अमोल पाटीलला सोबत घेऊन २०२२ मध्ये सागर स्टॉक हब व सागर साप्ताहिक वार्षिक फंड नावाने दोन वेगवेगळ्या संस्था सुरू केल्या. या दोन्ही कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक करून घेण्यास सुरुवात केली.

लाख रुपये गुंतवणूक केल्यास दरमहा १.७५ टक्के परतावा तथा व्याज देण्याचे आमिष दाखवत त्यांनी अनेकांकडून गुंतवणूक करून घेतली. तुम्ही केलेली गुंतवणूक आम्ही पुढे स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट व सोन्यामध्ये गुंतवणूक करत असल्याचे ते सांगत होते. या दोन्ही संस्था सुरू करताना त्यांनी आरबीआय व सेबीच्या कोणत्याही नियमांचे पालन केले नाही. त्यांनी आपल्यासह अनेकांकडून अशा अनधिकृतरीत्या ठेवी घेतल्या. ही रक्कम २ कोटी ६० लाख ६० हजार ९९७ असल्याचे फिर्यादी मंजुनाथ यांचे म्हणणे आहे.

शेअर मार्केटमध्ये तोटा

२०२२ ते मार्च २०२५ या काळात त्यांनी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक करून घेतली. परंतु त्यांनी सांगितल्यानुसार परतावा दिलेला नाही. तो मागण्यासाठी गेल्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये नुकसान झाले आहे. त्यामुळे आमच्याकडे तुमची रक्कम परत देता येत नाही, असे सांगत आहेत. आमच्याकडून रक्कम गुंतवणूक करून घेत फसवणूक केल्याचे मंजुनाथ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. शहापूर पोलिसांनी नोंद घेतली असून पोलिस निरीक्षक एस. एस. सीमानी पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT