बेळगाव : बसप्रवासात महिलेचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा कागवाड पोलिसांनी पर्दाफाश केला असून उत्तर प्रदेशातील सहा संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ लाख ९५ हजार रुपये किंमतीचे ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोहम्मद इस्लाम मोहम्मद तल्लूप (रा. इस्लामबाद, जि. बुलंदशहर) जफरयाब मोहम्मद खान (रा. हाजीपूर-बटोल, जि. बुलंदशहर), मोहम्मदअकील मोहम्मद इस्माईल (रा. कुचेजा, जि. बुलंदशहर), राजपाल हिरसिंग (रा. निजामपूर, ता. कुर्जा, जि. बुलंदशहर), दौजी बहोरी (रा. आदोली ता. जि. बुलंदशहर) कैराती मेहबूब खान (रा. हाजीपुर बटोळा, ता. जि. बुलंदशहर) अशी त्यांची नावे आहेत. ही टोळी विविध राज्यांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करुन गर्दीच्या बसमध्ये व बसस्थानक परिसरात दागिने व रोख रक्कम लंपास करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, वैशाली मल्लय्या दोडमणी (रा. तेरदाळ, ता. रबकवी-बनहट्टी, जि. बागलकोट, सध्या रा. मुंबई) यांनी कागवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ११ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० ते ९.५० या वेळेत त्या कागवाड बसस्थानकावरुन जोगुळकडे बसने प्रवास करत होत्या. यावेळी बसमधील अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली होती. त्यात ३०, १२ व ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच इतर दागिने असा एकूण ४ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी कागवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार अथणीचे पोलिस निरीक्षक संतोष हळ्ळूर व कागवाडचे पोलिस निरीक्षक राघवेंद्र खोत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. पथकाने तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि हालचालींचा मागोवा घेत संशयीताना जेरबंद केले. त्यांच्याकडून ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इतर मिळून एकूण ७ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे केवळ सदर गुन्हाच उघडकीस आला नसून अशाच प्रकारच्या इतर गुन्ह्यांचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्व संशयितांना न्यायालयासमोर हजर करुन त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलिसप्रमुखांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.