Belgaum family dispute: पतीने कोंडलेल्या पत्नी-मुलांची सुटका Pudhari
बेळगाव

Belgaum family dispute: पतीने कोंडलेल्या पत्नी-मुलांची सुटका

दिल्लीहून फोन येताच महिला पोलिस ठाणे-अक्का पथकाची तत्परता

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहरातील टिळकवाडीत पतीने पत्नी आणि मुलांना बेडरुममध्ये कोंडून ठेवून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला होता. याबाबत दिल्लीहून बेळगाव पोलिसांना फोन येताच महिला पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि अक्का पथकाने संयुक्तपणे कारवाई करत त्यांची सुटका केली. नुकत्याच उघडकीस आलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पतीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याची चौकशी सुरू आहे.

पतीकडून पत्नी आणि मुलांना घरात डांबून छळ होत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना नव्हती. तसेच याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल झाली नव्हती. शुक्रवारी (दि. 3) दिल्लीहून आलेला एक फोन कॉल व मिळालेल्या माहितीनुसार महिला पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी तत्काळ पुढील कारवाई करण्याचे आदेश अक्का पथकाला दिले. अक्का पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टिळकवाडीत जाऊन त्या घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर महिलेची आणि तिच्या दोन मुलांची सुटका केली. सुटका झाल्यानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.

कोंडून ठेवलेल्या महिलेने सुटका झाल्यानंतर पतीच्या विरोधात महिला पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सुटका झालेल्या महिलेला आणि तिच्या मुलांना पुढील सुरक्षेसाठी विमानाने तिच्या मूळ गावी दिल्लीला पाठवण्यात आले आहे. महिलेची सुटका करणाऱ्या अक्का पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक ए. रुक्मिणी, कर्मचारी आर. आय. कडलगी, स्वप्ना गोंधळी, रूपश्री यमकनमर्डी, सिद्धप्पा सांगली यांचा समावेश होता. त्यांच्या या कार्याबद्दल कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT