बेळगाव

Belgaum Fraud Case : सबरजिस्ट्रार, बॉण्ड रायटरला अटक

कुंपणाने खाल्ले शेत, बनावट कागदपत्राद्वारे जमीन लाटली

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव ः शेतजमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून ती परस्पर लाटल्याचा प्रकार हुक्केरी तालुक्यातील कुरणीवाडी येथे उघडकीस आला आहे. हा प्रकार मे 2024 मध्ये घडला असून हुक्केरी पोलिसांनी जमीन खरेदी व्यवहारांची नोंद करणाऱ्या सबरजिस्ट्रार आणि बॉण्ड रायटरला अटक केली आहे.

हुक्केरीचे उपनोंदणी अधिकारी मडीवाळप्पा बसवराज बानीमठ (वय 34, रा. तिगडोळी, ता. कित्तूर) आणि पेशाने वकील असलेले बॉण्ड रायटर आनंद महादेव दड्डीमनी (वय 35, रा. वीणकर गल्ली, हुक्केरी) अशी अटक झालेल्या जोडगोळीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुरणीवाडी येथील शेतकरी शिवानंद पराप्पा माणगावी यांच्या मालकीची कुरणी येथे सर्व्हे क्रमांक 119/1 मध्ये 2 एकर 1 गुंठा शेतजमीन आहे. या जमिनीचे खोटे कब्जेमुक्त करारपत्र तयार केले गेले. हे करारपत्र हुक्केरी उपनोंदणी कार्यालयात सादर करून त्याद्वारे शेतजमिनीची दुसऱ्याच्या नावे नोंद करून घेतली. हा सर्व प्रकार उपरोक्त दोघा संशयितांनी केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला.

आधार, पॅनकार्ड बनावट

मूळ मालक वेगळाच असताना तिऱ्हाईत व्यक्तीला उभे करून त्याच्या नावाचे आधारकार्ड व पॅनकार्ड तयार केले. अन्य कागदपत्रे तयार करून घेत तोच मालक असल्याचे भासवले. यानंतर त्या मालकाने कब्जा सोडून दिल्याचे दाखवत त्याच्या नावची शेतजमीन भलत्याच व्यक्तीच्या नावे केली. या सर्व प्रकरणाचा तपास केल्यानंतर उपरोक्त दोघांचा सहभाग आढळून आला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अन्य कोणी आहेत का, याचा तपास हुक्केरी पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT