बेळगाव : शहर परिसरात शनिवारी (दि. ६) मान्सूनचे आगमन झाले होते. तर रविवारी (दि. ७) मान्सून पूर्णपणे सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हवामान खात्याने पुढील चार दिवस दमदार पावसाची शक्यता वर्तवली असून सध्याचा जोर पाहता अंदाज खरा ठरला आहे.
सलग दुसऱ्या दिवशीही दुपारनंतर बेळगाव शहर परिसर पावसाने चिंब भिजला. दुपारनंतर हवामानात अचानक बदल होऊन काही भागात रिमझिम तर काही ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. सोमवारपासून (दि. ८) मृग नक्षत्र सुरू होत असून त्याच्या पूर्वसंध्येलाच पावसाने जोर धरल्याने सर्वजण सुखावले आहेत. पावसामुळे बेळगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
रविवारी दुपारनंतर आभाळ ढगांनी भरुन आले होते. दुपारी तीनच्या सुमारास बेळगाव तालुक्याच्या पश्चिमेकडे पावसाला सुरुवात झाली. चारनंतर शहर परिसरात रिमझिम पाऊस बरसू लागला. काही भागात पावसाचा जोर इतका होता की प्रमुख रस्त्यांवर आणि सखल भागात पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे रविवारी सुट्टीनिमित्त बाहेर पडलेल्या लोकांची काही काळ तारांबळ उडाली. रस्त्यावर रेनकोट व छत्रीचा आधार घेत वाहनचालक व पादचारी लक्ष वेधून घेत होते. काही तरुणांनी वाहन चालवताना पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना दिलासा मिळाला आहे.
बाजारपेठेत पावसाला सुरुवात होताच रस्त्यावरील विक्रेते छत्री आणि रेनकोट घेऊन बसल्याचे पाहायला मिळाले. लोकही पावसापासून बचाव करण्यासाठी रेनकोट आणि छत्र्यांचा वापर करताना दिसले. मात्र, सायंकाळी रिमझिम पाऊस असल्याने बाजारपेठेतील गर्दीवर परिणाम जाणवला. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरु असल्याने याचा रस्त्यावरील गर्दीवर परिणाम दिसत होता. शहर उपनगरात विविध रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली.
पाऊस अचानक सक्रिय होईल, याची यत्किंचितही कल्पना नसल्याने अनेकांवर भिजण्याची वेळ आली. दुपारी सुरू झालेला पाऊस रात्री उशीरापर्यंत न थांबल्याने पाऊस जाण्याची वाट पाहणाऱ्यांना भिजतच घरे गाठावी लागली. तर अनेकांनी रेनकोट, पावसाळी जॅकेट, छत्र्यांची शोधाशोध सुरू केली. अनेकांनी रेनकोट, जॅकेट्स खरेदी करण्यासाठी दुकाने गाठली. मान्सून सक्रिय झाल्याने आता पावसाळी साहित्याची बाजारपेठ बहरणार आहे. पण, अनेक दुकानदारांनी पाऊस वेळेवर सुरू होणार नाही, असा अंदाज बांधून साहित्याची ऑर्डर विलंबाने दिली होती. त्यांना आता साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.