Belgaum water crisis Pudhari
बेळगाव

Belgaum water crisis: उन्हाची झळ; भूजलाने गाठला तळ

तालुक्यातील अनेक गावांतून पाणी समस्या : पिके धोक्यात येण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : तालुक्याच्या ग्रामीण भागात उन्हाळा तीव्र होऊ लागला आहे. विहिरी, कूपनलिकांचे पाणी खालावत चालले असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण बनत आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

यंदा पावसाळा समाधानकारक नव्हता. यामुळे भूजल पातळी आता झपाट्याने खालावत चालली आहे. गेल्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होत चालल्या आहेत. ग्रामीण भागातील तापमानही 33 अंशापर्यंत जात आहे. वाढत्या उन्हामुळे ग्रामस्थ हैराण बनले आहेत. वळीव पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पूर्व भागात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पश्चिम भागातही काही प्रमाणात वळिवाने हजेरी लावली. परंतु, उत्तर भागात वळीव न बरसल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. भूजल पातळी खालावत चालली आहे. पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

उचगाव परिसरात मार्कंडेय नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे. याचा फटका परिसरातील पिकांना बसला आहे. प्रामुख्याने भाजी पिके सुकून चालली आहेत. कंग्राळी परिसरात मार्कंडेय नदीत पाणी साचून आहे. मध्यंतरी झालेल्या वळीव पावसाने मार्कंडेय नदीपात्रात वाढ झाली आहे. अलतगा येथे कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात पाणी अडवण्यात आले आहे.

साधारणपणे बेळगाव तालुक्यात नेहमीच समाधानकारक पाऊस हजेरी लावतो. नदी, नाले तुंडूंब होतात. मार्कंडेयला चारदा पूर येतो. परंतु, पाणी साठवून ठेवण्यासाठी धरणाची सोय नसल्याने पावसाचे पाणी वाहून जाते. यातून उन्हाळ्यात दरवर्षी पाणी समस्या निर्माण होते. शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. पिकांना फटका बसतो.

पिण्याची समस्या गंभीर

ग्रामीण भागात प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. विहिरी, कूपनलिकेतील पाणीपातळी खालावले आहे. यामुळे नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. तर अनेक ठिकाणी पाणी मिळविण्यासाठी नळावर महिलांना तिष्ठत थांबावे लागत आहे. अनेक गावांतून जलजीवन मिशन योजना कूचकामी ठरली आहे. पाणी मिळविण्यासाठी महिलांना भटकावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT