बेळगाव

करोशीतील खासगी दवाखान्यांवर छापे

नागरिकांकडून आलेल्या तक्रारीवरून कारवाई : सात पथके दाखल

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बोगस डॉक्टर्सबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारीवरून करोशी (ता. चिकोडी) येथील खासगी दवाखान्यांवर जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गडाद यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ७ पथकांनी एकाचवेळी छापा टाकला आहे. यामुळे करोशी येथील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

करोशी येथील काही डॉक्टर बोगस असून रुग्णांना उच्च क्षमतेची औषधे दिली जात आहेत. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे दिले होते. त्यांच्या सूचनेवरून जिल्हा कुटुंब कल्याण व आरोग्य अधिकारी डॉ. गडाद यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ७ पथकांनी दिवसभर दवाखान्यांवर छापा टाकला.

गेल्या काही दिवसांपासून करोशी येथे छापा टाकण्याचा विचार होता. छापा टाकल्याचे समजताच काहीजण दवाखान्याला कुलूप लावून पसार झाले आहेत. बेकायदेशीर कृत्य केलेल्यांविषयी जिल्हा समितीसमोर अहवाल मांडून कारवाई केली जाईल, असे डॉ. गडाद यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले. या पथकात बेळगाव जिल्हा कुटुंब कल्याण व आरोग्य खात्याचे जिल्हा अधिकारी डॉ ईश्वर गडाद, तालुका आरोग्य अधिकारी एस एस खनदाळे, के पी एम इ जिल्हा नोडल अधिकारी डॉ एम वी भोवी, कुमार चौगला यांच्यासह आरोग्य खात्याचे कर्मचारी, महसूल खात्याचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

अनेक डॉक्टर पसार

एकाचवेळी अचानक सात ते आठ वाहने येऊन गावातील दवाखान्यांवर छापा टाकल्याने गोंधळ उडाला. अनेक डॉक्टर कारवाईच्या भीतीने दवाखान्यांना कुलूप लावून पसार झाल्याचे दिसून आले. बोगस डॉक्टर्सविरुद्ध आता कोणती कारवाई होणार, हे पाहावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT