Gurlapur Farmer Protest
चिकोडी : ऊसाला योग्य दर मिळावा, यासाठी होत असलेल्या आंदोलनात शेतकऱ्याने खासदार जगदीश शेट्टर यांच्या समोर विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील गुरलापूर क्रॉस येथे घडली आहे. लक्कप्पा गुनधर (वय 30) असे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
कर्नाटकात सीमाभागात मागील चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्र प्रमाणे टनाला साडेतीन हजार रुपये दर द्यावा, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांकडून आंदोलन सुरू आहे. काल या ठिकाणी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी भेट देऊन 3200 रुपये दर देण्याचे घोषणा केली. पण शेतकरी संघटनांनी नकार दिला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची मदत मागितली आहे.
त्यानंतर आज बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी भेट देऊन भाषण करीत असताना समोर आंदोलनास बसलेले शेतकऱ्याने अचानक विषप्राशन केले. त्यामुळे हजारोंच्या संख्येने जमलेल्या शेतकरी आंदोलन करताना मध्ये एकच गोंधळ माजला. अस्वस्थ शेतकऱ्याला दुचकीवरून दवाखान्यात दाखल करण्यात आले. सध्या शेतकऱ्याची तब्येत गंभीर असल्याचे समजते. दरम्यान, ऊस दरासाठी चिकोडी, बेडकीहाळ, संकेश्वर नजीक देखील रास्ता रोको करून आंदोलन सुरू आहे.