GST Fraud Pudhari
बेळगाव

Belagavi GST scam: बेळगावच्या जीएसटी घोटाळ्याची व्याप्ती वाढती

मुख्य सूत्रधाराला अटक : 593 कोटी रूपयांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : डीजीजीआय बेळगाव झोनल विभागाने उघडकीस आणलेल्या जीएसटी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तब्बल 593 कोटींचा हा इन्व्हॉइस घोटाळा असून यामध्ये नुकतीच एकाला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले. मुख्य संशयित असून महंमद सैफुल्ला असे त्याचे नाव आहे.

बेळगाव विभागीय वस्तू व सेवा गुप्तचर महासंचालनालयाने (डीजीजीआय) काही महिन्यांपूर्वी जीएसटीसंबंधीची बनावट इन्व्हॉइस तयार केल्याचे उघडकीस आणले होते. याचा सखोल तपास केला असता बंगळूर येथील एका टॅक्स कन्सल्टंटची लिंक आढळून आली. या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल 593 कोटींची बनावट बिले तयार केल्याचे समोर आले आहे. याद्वारे आयटीसी अर्थात इनपुट टॅक्स क्रेडिट चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे उघडकीस आले आहे.

एका व्यावसायिकाकडे अशी बनावट बिले सापडल्यानंतर डीजीजीआयने राज्यभर छापे टाकण्यास सुरवात केली. यामध्ये बंगळूर येथील स्टार टॅक्स कन्सल्टंटवर छापा टाकला असता कोट्यवधी रूपयांची बनावट बिले आढळून आली. जेव्हा सखोल चौकशी केली, तेव्हा केंद्र व राज्य सरकारला जीएसटी न भरता व फक्त कागदपत्रे रंगवत 235 कोटींची आयटीसी देण्यात आल्याचे समोर आले. अटक केलेला संशयित सैफुल्ला हा जीएसटीसंबंधीची केवळ बनावट बिले व ईलेक्ट्रॉनिक वजन बिले तयार करण्याची मोठी यंत्रणा चालवत असल्याचे समोर आले. ऑनलाईन अकाऊंटिंग सॉफ्टवेअरचा वापर करत अनेक बनावट संस्था स्थापन केल्या. त्याद्वारे बनावट जीएसटी कमिशनच्या बदल्यात बनावट बिले देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तपासात हे सैफुल्लाने कबूल केल्यानंतर त्याला 24 फेब्रुवारी रोजी अटक झाली. त्यानंतर त्याला बंगळूर येथे न्यायालयासमोर हजर केले गेले. न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मंजूर करून घेऊन त्याला बेळगावला आणले गेले. येथील न्यायालयासमोर हजर करून त्याची कारागृहात रवानगी केली. त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फसवणूक प्रकरणात किती बनावट कंपन्या आहेत, कोणी लाभ घेतला आहे, या साखळीत आणखी कोण सामील आहे, याचा तपास डीजीजीआयकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT