बेळगाव : बसवनकोळ येथील माजी महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांच्या घरावर, कारवर दगडफेक करत मोठे नुकसान केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी त्यांनी काकती पोलिसांत फिर्याद दिली आहे. हिंडाल्को कंपनी परिसरात तरुणाने केलेल्या आत्महत्येची किनार या दगडफेकीमागे असल्याचे सांगण्यात येते. परंतु, त्या घटनेशी आपला संबंध नसल्याचे माजी महापौरांचे म्हणणे आहे.
दरम्यान, तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी माळमारुती पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामाचारी हालाप्पा हालभावी व नंदी असोसिएटस्चे कंत्राटदार अशा दोघांचा समावेश आहे. माजी महापौर चिक्कलदिन्नी याच नंदी असोसिएटस्चे संचालक आहेत.
दोन दिवसांपूर्वी शंकर तळवार नामक तरुणाने हिंडाल्को फॅक्टरी परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नोकरीत कायम करण्याचे सांगत कंत्राटदार रामाचारी याने पाच लाख घेतले. परंतु, कायम केले नाही व पैसेही परत देत नसल्याने शंकरने गळफास घेतल्याचा स्टेटस मृत्यूपूर्वी ठेवला होता. शंकरसह सर्व कामगार नंदी असोसिएटस्मार्फत नियुक्त झाल्याचे मुत्यानहट्टी ग्रामस्थांना समजले. त्यामुळे त्यांचा राग माजी महापौरांवर होता. याच रागातून काहींनी गुरुवारी माजी महापौरांच्या घरावर, दारात लावलेल्या कार, दुचाकीवर दगडफेक करत नुकसान केले. याप्रकरणी काकती पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.
माजी महापौरांचे म्हणणे आहे की, ज्या बारा जणांना त्यांनी नोकरी लावली होती, त्या सर्वांना तेथे कायमस्वरूपी नोकरी मिळाली. मात्र, ज्या रामाचारीने पाच लाख रुपये देऊन नोकरीत कायम करण्याचे आश्वासन दिले होते, त्याच्याशी आपला काही संबंध नाही.