बेळगाव : येनकेनप्रकारे मराठी भाषिकांना लक्ष्य करणाऱ्या पोलिसांनी होळीदिवशी आयते कोलीत मिळाले. होळीच्या ठिकाणी डीजेवर ‘जय, जय महाराष्ट्र माझा’ हे गीत लावल्याबद्दल टिळकवाडी पोलिसांनी दोघांविरोधात एफआयआर केला.
राजहंस गल्ली, अनगोळ येथे होळी उत्सव साजरा करताना येथील आयोजक तरुणांनी डीजे लावला होता. यावर ‘जय, जय महाराष्ट्र माझा’ हे गीत लावले होते. तरुणांनीच याचा व्हिडीओ करून तो सोशल मीडियावर टाकला होता. याची दखल घेऊन काही कन्नडिगांनी याविरोधात टिळकवाडी पोलिसांत फिर्याद दिली.
त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा याबाबत एफआयआर दाखल करून घेतला. रात्री उशिरापर्यंत एफआयआरची प्रक्रिया सुरू आहे. येथे होळी दहनचे आयोजन करणारा प्रमुख व डीजे मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.