बेळगाव

Belgaum news: पोलिसहो, हे शेतकरी की गुन्हेगार?

हलगा-मच्छे बायपास; पाण्याच्या निचऱ्यावरून वादंग, धरपकडीचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : हलगा-मच्छे बायपास मार्गातील येळ्ळूर रस्त्यावर पूल उभारणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला असून, पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईप टाकण्याचे कामही सुरू आहे; मात्र निचऱ्याचे नियोजन अपुरे असल्याचा आरोप करत बुधवारी शेतकऱ्यांनी कंत्राटदाराला धारेवर धरले. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. शेतकऱ्यांना ताब्यात घेण्याचाही प्रयत्न पोलिसांनी केला.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, येळ्ळूर मुख्य रस्ता आणि पूर्वीच्या नाल्यांपासून दूर अंतरावर पाईप टाकण्याचे काम सुरू असल्याने शहापूर-वडगाव शिवाराला फटका बसण्याची भीती आहे. बळ्ळारी नाल्यापर्यंत खोदाई करून संपूर्ण निचऱ्याची व्यवस्था करावी, अन्यथा अर्धवट कामामुळे पावसाळ्यात शेती पाण्याखाली जाईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याने काम सुरू असलेल्या वाहनावर दगडफेक करण्याचा इशारा दिल्याने वातावरण तणावपूर्ण झाले.

यावेळी पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. हवे तर अटक करा, असे म्हणत त्या शेतकऱ्याने पोलिसांसमोरच हात वर केले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी यांनी संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश नाईक, सुभाष लाड, अनिल अनगोळकर, हणमंत बाळेकुंद्री यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

कंत्राटदार-पोलिस एकत्र

पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी यांनी कंत्राटदाराला काम सुरू ठेव, कोण आडवे येते ते मी पाहतो, असे सांगून प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली असून, शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना शेतकरी संघटना मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. अन्यायाविरोधात संघटित लढा उभारण्याची गरज असल्याचे मतही शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT