बेळगाव

Belagavi farmers: शेतकऱ्यांना प्रतीक्षा दमदार पावसाची

येळ्ळूर परिसरातील चित्र; कोळपणी-भांगलणीच्या कामाला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : येळ्ळूर परिसरात शेतीकामांना वेग आला असून बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, अद्याप समाधानकारक व दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. पिकांची जोमदार वाढ आणि भरघोस उत्पादनासाठी सातत्यपूर्ण पावसाची गरज आहे.

येळ्ळूर, धामणे, सुळगा, देसूर, मच्छे, पिरनवाडी तसेच परिसरातील इतर गावांमध्ये जवळपास १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या शेतकरी कोळपणी, भांगलणी, तणनियंत्रण तसेच खत देण्याच्या कामात व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी पिकांची उगवण चांगली झाली असून भात, सोयाबीन व इतर खरीप पिके जोमाने वाढू लागली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे, पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती आहे. विशेषतः भात लागवडीसाठी आणि इतर खरीप पिकांच्या वाढीसाठी जोरदार पाऊस होणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. वेळेवर आणि समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप हंगाम चांगला जाईल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. सध्या संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT