बेळगाव : कुत्रे अचानक आडवे आल्याने दुचाकीaस्वाराने जोरात ब्रेक दाबल्याने मागे बसलेल्या ७५ वर्षीय महिलेचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला. बेळगाव-बागलकोट मार्गावर सांबऱ्याजवळ (ता. बेळगाव) गुरुवारी (दि. १८) सायंकाळी हा अपघात झाला. शांतव्वा बसप्पा कलमठ (वय ७५, रा. अशोकनगर, बेळगाव) असे त्यांचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शांतव्वा या आपल्या मुलासोबत नातेवाईकांच्या घरी जाऊन दुचाकीवरुन बेळगावकडे परतत होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास सांबरा गावाजवळ अचानक कुत्रे रस्त्यावर आल्याने मुलाने जोरात ब्रेक दाबला. यामुळे मागे बसलेल्या शांतव्वा यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघातानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेत त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला असून आईच्या मृत्यूमुळे त्याला धक्का बसला आहे.
अपघात नेमका कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाला याबाबत सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता. माहिती मिळताच रहदारी उत्तर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अपघात मारीहाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मारीहाळ पोलिसांना माहिती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.