बेळगाव : शेतात काम करताना तुटून पडलेल्या वीज तारेचा स्पर्श होऊन पती व पत्नीचा जागीच मृत्यू झाला. जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील नागनूर येथे मंगळवारी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली. सुरुवातीला पत्नीला विजेचा धक्का बसला. तिला वाचवायला जाऊन पतीलाही धक्का बसल्याने त्याचाही मृत्यू झाला.
श्रीशैल मुगळखोड (वय ४२) व राजश्री श्रीशैल मुगळखोड (वय ३६, दोघे रा. नागनूर, ता. मुगळखोड) अशी दुर्दैवी मृत दाम्पत्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी : सध्या पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने सध्या सगळीकडे शेत मशागतीची कामे सुरू आहेत. मंगळवारी सकाळी मुगळखोड दाम्पत्य शेतातील नेहमीचे काम करण्यासाठी गेले होते. उसाच्या शेतातील भांगलण करत असताना शेतात खांबावरील तुटून पडलेल्या तारेचा त्यांना अंदाज आला नाही. पत्नीचा पाय त्यावर पडल्याने तिला तारेचा झटका बसला. त्याबरोबर ती बेशुद्ध होऊन पडली. तिला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या पतीलाही तारेला स्पर्श झाला.
दोघांनाही जोराचा झटका बसल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मुडलगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तलाठ्यांनीही भेट देऊन पाहणी केली. राबून खाणारे दाम्पत्य अचानक मृत पावल्याने त्यांची मुले वाऱ्यावर पडली आहेत. मृत्यूची बातमी समजताच घरातील आक्रोश मने हेलावणारा होता. सरकारने या कुटुंबाला मोठी भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी सरकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. पोलिसांनी नोंद करून घेत पुढील तपास सुरू केला आहे.