बेळगाव

Belagavi municipal corporation: मनपाने हटविले ‘स्वच्छ बेळगाव’चे फलक

कार्यक्रमालाही परवानगी नाही : शिवम असोसिएट्सविरोधात पोलिसांत तक्रार

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शिवम असोसिएट्सतर्फे रविवारी (दि. १७) आयोजित स्वच्छ बेळगाव मोहिमेला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे, महापालिकेनेही या कार्यक्रमाचे शहरात उभारण्यात आलेले अनधिकृत फलक हटविले असून माळमारुती पोलिसांत तक्रार दिली आहे.

शिवम असोसिएट्सचे शिवानंद नीलण्णावर यांनी रविवारी सरदार्स मैदानावर स्वच्छ बेळगाव मोहिमेंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. या दिवशी संपूर्ण शहरात २५ हजार लोकांच्या सहभागाने स्वच्छ बेळगाव मोहीम राबवण्यात येणार आहे, असे सांगितले होते. पण, जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. त्यामुळे, महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्या उपस्थितीत शहरातील फलक आणि झेंडे हटविण्यात आले. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

महापालिका आयुक्त कार्तिक एम. म्हणाले, शहरात लावलेल्या बॅनरवर महापालिकेचा अधिकृत नोंदणी क्रमांक नव्हता. शहराच्या सौंदर्याला बाधा आणणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे म्हणत त्यांनी नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

मात्र, या कारवाईमागे राजकीय दबाव असण्याची शक्यता वर्तवत प्रशासनाने कितीही अडथळे आणले तरी आम्ही नियोजित कार्यक्रम करणारच, असे आयोजकांनी सांगितले आहे. दुसरीकडे, हा एक खासगी उपक्रम असल्याने महापालिका त्याला सहकार्य करु शकत नाही, असे प्रशासनाकडून आधीच कळवण्यात आले होते. अधिकृत परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात गर्दी जमवणे धोक्याचे ठरू शकते, या कारणास्तव अनधिकृत फलक हटविण्यात आले आहेत, असे आयुक्त कार्तिक यांनी सांगितले आहे. यावेळी महसूल उपायुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान सुरवातीला अनधिकृत फलक उभारणी केल्याप्रकरणी शिवम असोसिएट्सविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त कार्तिक यांनी सांगितले होते. पण, संध्याकाळी महापालिकेच्या महसूल विभागाने माळमारुती पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यामुळे, स्वच्छ बेळगाव या कार्यक्रमाचे भवितव्य अधांतरीच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT