बेळगाव : राकसकोप जलाशयाने तळ गाठल्याने बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्यात शुक्रवारपासून ६० टक्के कपात करण्यात आली आहे. शिवाय पाणीपातळी खालावल्यामुळे मृतसाठ्यातील पाणीउपसा करण्याची वेळ आली आहे. हा पाणीसाठा १५ दिवस पुरेल इतका असून जूनअखेरपर्यंत पाऊस न झाल्यास दुष्काळी स्थिती निर्माण होईल. टंचाईमुळे आठ दिवसांआड होणार पाणीपुरवठा दहा दिवसांआडवर गेला आहे. सध्याच्या पुरवठ्याप्रमाणे ७ जुलैपर्यंत राकसकोप जलाशयातील पाणीपुरणार असल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाने दिली आहे.
बेळगाव शहरापासून सुमारे १६ किमी अंतरावर असलेले राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी २,४७७ फूट पाणी पातळी आवश्यक असते. गुरुवार (दि.१८) पाणीपातळी २,४४८.५० फुटावर पाणी पातळी आल्याने पाणीपुरवठा यंत्रणेवर ताण आला असून, शहरात दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा जलाशय बेळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. शहराच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येला पाणी पुरवते. पावसाळा वेळेवर सुरू होऊन पुरेसे पाणी जमा न झाल्यास शहरात पाणी वितरणाचे वेळापत्रक कोलमडणार आहे. सध्या राकसकोप जलाशयातून ४० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
राकसकोप जलाशयात १५ दिवस पाणीपुरवठा होईल इतका पाणीसाठा आहे. जूनअखेर पावसाचे आगमण झाले नाही तर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.- धीरज उभयकर, व्यवस्थापक, एलॲण्डटी कंपनी