बेळगाव : न्यायालयाच्या आवारासमोरच असलेल्या मुख्य रस्त्यावर तरुणांच्या दोन गटांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस हवालदारावरच काही तरुणांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांनी पाचजणांना अटक केली असून आणखी आठजणांचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये समीर अफजल मुल्ला (वय २६), बादशहाखान नादरखान पठाण (२७), फारुख नूरअहमद मकानदार (२६), शाहीद शब्बीर अत्तार (२६, सर्व रा. रुक्मिणीनगर) व अन्य एकाचा समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, तीन वर्षांपूर्वी माळमारुती ठाणा परिसरात खुनी हल्ल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील संशयित गुरुवारी न्यायालयात भांडण करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रे सोबत घेऊन आले होते. याठिकाणी दोन गटांमध्ये अचानक वाद व हाणामारी सुरू झाली. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले मार्केट पोलिस ठाण्याचे हवालदार मल्लिकार्जुन गुंजीकर हा वाद मिटविण्यासाठी धावले. त्यांनी दोन्ही गटांतील तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही तरुणांनी हवालदार गुंजीकर यांच्यावरच हल्ला चढविला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही गटांतील तरुणांना ताब्यात घेतले.
घटनेत हवालदार गुंजीकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १३ जणांवर सरकारी कामात अडथळा आणणे व पोलिसावर हल्ला करणे यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यातील पाचजणांना अटक केली असून आठजणांचा शोध सुरू आहे. मार्केट पोलिस पुढील तपास करत आहेत. मात्र, कर्तव्य बजावत असताना पोलिस कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे लोकांतून संताप व्यक्त होत आहे.