बेळगाव

Belgaum Water Crisis: शहरात टँकरच्या फेऱ्या वाढल्या

राकसकोप, हिडकल गाठताहेत तळ; तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप व हिडकल जलाशयातील पाणीसाठा यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमालीचा घसरल्याने शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद होत चालले आहे. त्यामुळे, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिका व एलअँडटी कंपनीने केले आहे. दुसरीकडे शहर उपनगरातील अनेक टंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

राकसकोप जलाशयातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा तीन फुटाने तर हिडकल जलाशयातील पाणीसाठा तीन टीएमसीने कमी झाला आहे. पावसाळ्याला वेळेत सुरुवात झाली नाही तर ही जलाशये तळ गाठण्याचा धोका आहे. तसे झाल्यास शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. एकूणच, उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने पुढील काही आठवडे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

राकसकोप जलाशयाची एकूण क्षमता अर्धा टीएमसी आहे. २ जून रोजी जलाशयातील पाण्याची पातळी २,४५१.३० फूट नोंदवली गेली. गतवर्षी याच दिवशी ही पातळी २,४५४.२० फूट होती. म्हणजेच यंदा तब्बल तीन फूट पाणीसाठा कमी असून ही घट चिंताजनक मानली जात आहे. हिडकल जलाशयातही समाधानकारक साठा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन वर्षांनी या पात्रातील विठ्ठल मंदिर उघडे पडले आहे. जलाशयाची क्षमता ५१ टीएमसी असून सध्या तेथे ६.६१३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याचदिवशी ९.९४० टीएमसी साठा होता. म्हणजेच यंदा सरासरी तीन टीएमसीने घट झाली आहे. या दोन्ही जलाशयांतील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम जाणवत आहे.

सध्या कडक उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. तरीसुद्धा शहरात आठ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे, लोकांना दैनंदिन गरजांसाठी पाणी साठवून ठेवावे लागत आहे. अनेक भागांत पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. काही भागात कित्येक दिवस पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. अशा भागांत टँकरची वारंवारता वाढविण्यात आली आहे.

तसेच अनेक लोक टँकरचे पाणी खरेदी करत आहेत. दरवर्षी साधारण ६ जूनच्या सुमारास मान्सून दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून उशिरा आल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनानेही लोकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे. मॉन्सून वेळेवर दाखल झाल्यास दिलासा मिळू शकतो, अन्यथा पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT