बेळगाव ः किल्ला तलावात भगवान गौतम बुद्धांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी सुरु असून केएलईजवळ शहराच्या प्रवेशद्वारावर राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आमदार राजू सेट निधी उपलब्ध करुन देणार आहेत, अशी माहिती कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीचे विभागीय संचालक रवी बस्तवाडकर यांनी दिली.
गौतम बुद्ध आणि राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा बसविण्यासंदर्भात सोमवारी (दि. 19) महापालिकेत महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस नगरसेवक, महापालिका अधिकारी तसेच दलित संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
किल्ला तलावाच्या मध्यभागी भगवान गौतम बुद्धांचा 100 फूट उंचीचा पुतळा आणि केएलई परिसरातील राष्ट्रीय महामार्ग जोडणाऱ्या चौकात राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्याचा ठराव महापालिकेने 2016 मध्ये एकमताने मंजूर केला होता. मात्र, आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याने तत्काळ कार्यवाही करावी, या मागणीसाठी गेल्या आठवड्यात दलित संघर्ष समितीतर्फे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी महापौरांनी मागणीबाबत तातडीने बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. सोमवारी सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती किल्ला तलावात बुद्धांचा पुतळा बसवण्यास महापालिकेची कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरु असल्याचे सांगण्यात आले. यावेळी उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाली, नगरसेवक रवी धोत्रे आदी उपस्थित होते.