बेळगाव : व्यवसायाच्या निमित्ताने मुलासोबत काकतीहून बेळगावला दुचाकीवरून येणाऱ्या माय-लेकाच्या दुचाकीला खासगी बसने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रस्त्यावर कोसळलेली महिला जागीच ठार झाली, तर मुलगा जखमी झाला. लीला कृष्णा भंडारे (59, रा. काकती) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास काकती जवळ हा अपघात घडला.
याबाबत काकती पोलिसांनी दिलेली माहिती अशी कूी सदर महिला देशी अंडी विक्रीचा व्यवसाय करते. शनिवारी सकाळी ती मुलासोबत बेळगावला दुचाकीवरून येत होती. महामार्गावर दुचाकी आली तेव्हा पाठीमागून भरधाव आलेल्या खासगी बसची दुचाकीला धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर कोसळले. गंभीर दुखापत झालेल्या लीला भंडारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा संतोष (वय 38) हा जखमी झाला आहे. काकती पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला असून निरीक्षक सुरेश शिंगे पुढील तपास करीत आहेत.