Devendra Fadnavis (Pudhari Photo)
बेळगाव

Devendra Fadnavis: उच्चाधिकार समितीची लवकरच बैठक

सीमाप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सध्या सुरू असलेले विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ज्ञ आणि उच्चाधिकार समितीची बैठक बोलावण्यात येईल, सीमावासीयांशी चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांना दिली. दरम्यान, अधिवेशन बुधवारी संपले. त्यामुळे नजीकच्या भविष्यात बैठकीची अपेक्षा आहे.

आमदार जयंत पाटील यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांशी चर्चा केली होती. सीमाप्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्याला गती देण्यासाठी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची बैठक होणे आवश्यक आहे, असे समिती नेत्यांनी सांगितले होते. शिवाय तसे पत्रही खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी त्यांना दिले होते.

त्यानंतर आमदार पाटील यांनी सोमवारी (दि. 23) मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सीमाभागातील लोकांच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या. त्यावर विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर सीमाप्रश्नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची बैठक बोलावण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT