बेळगाव : शहरातील रिक्षाचालक संघटनांनी बुधवारी (दि. 21) विविध मागण्यांचे निवेदन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. रिक्षा भाड्यात वाढ, उबर, रॅपिडो बाईक्सचे परवाने रद्द करणे, शहरात रिक्षा वाहतुकीसाठी असलेली 16 किमीची मर्यादा 30 किमीपर्यंत वाढवावी आदी मागण्या ऑटो चालक, मालक संघटनेच्यावतीने करण्यात आल्या. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारले.
कन्नड साहित्य भवन येथू मोर्र्चाला सुरुवात झाली. चन्नम्मा चौकात काहीकाळ निदर्शने करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे रिक्षाचालकांना जगणे खूप कठीण झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे संसाराचा हाकताना कसरत करावी लागत आहे. दीड किमीच्या आत येणाऱ्या प्रवाशांसाठी आम्ही किमान भाडे 50 रुपये निश्चित केले आहे. त्यानुसार दीड किमीपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रति किमी 30 रुपये अतिरिक्त भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाने ओला, उबर, रॅपिडो बाईक्सचे परवाने रद्द केले आहेत. तरीही शहरात ओला, उबर, रॅपिडो बाईक्स प्रवासी वाहतूक करताना दिसतात. यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. शहरात परवान्याशिवाय धावत असलेल्या इलेक्ट्रिक रिक्षा बंद कराव्यात. शहरात रिक्षा वाहतुकीसाठी 16 किमीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ती 30 किमीपर्यंत वाढवावी. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीन दिवसांत अनिश्चित काळासाठी आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. आपल्या मागण्यांवर विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना दिले.
निवेदनावर ऑटो चालक, मालक संघटनेचे अध्यक्ष मन्सूर होनगेकर, उपाध्यक्ष गौतम कांबळे, सचिव अब्दूल दुबईवाले, रफिक देवलापूर, अझीम मुल्ला, उमेश शंकरहाळी, अब्दूल शेख, मलिक मुल्ला, मुन्ना हवालदार, मैनुद्दिन मोकाशी, जयभीम ऑटो चालक, मालक संघटना अध्यक्ष बसवराज अवरोळी, इमाम किल्लेवालेसह यांच्यासह अनेक रिक्षाचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.