बेळगाव : धारदार शस्त्राने एकावर वार झाल्याची घटना माळमारुती पोलिस ठाणा हद्दीत घडली. परंतु, जखमी व्यक्ती शहरातील गोंधळी गल्लीत येऊन पडल्याने खडेबाजार पोलिसांनी याची नोंद करून घेतली आहे. नेमीनाथ बाहुबली बुडवी (वय ५६, रा. अलारवाड) असे जखमीचे नाव आहे. हल्लेखोराचे नाव अद्याप समजलेले नाही.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, नेमीनाथ व आणखी एकामध्ये धर्मनाथ भवनजवळ क्षुल्लक कारणातून वाद झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार दोघांनीही मद्यप्राशन केले होते. यावेळी समोरच्या व्यक्तीने नेमीनाथ यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. गळ्यावर वर्मी घाव लागलेला असतानाही ते दुचाकीवरुन तसेच गोंधळी गल्लीत आले. रक्तस्त्राव होत असल्याने कुणीतरी ही माहिती खडेबाजार पोलिसांना दिली. तोपर्यंत नेमीनाथ गोंधळी गल्लीत रस्त्यावर कोसळले होते.
त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त भूषण बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी एन. व्ही. बरमणी, खडेबाजारचे एसीपी शेखराप्पा एच. घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन गेले.
हल्ला करणाऱ्याच्याविरोधात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, त्या व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही. सध्या खडेबाजार पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. परंतु, घटना धर्मनाथ भवनजवळ घडल्याने हे प्रकरण त्या ठाण्याकडे वर्ग केले जाणार असल्याचे खडेबाजारचे निरीक्षक महांतेश धामण्णावर यांनी सांगितले.