बेळगाव

Belgaum investment fraud: 'शिवम'नंतर आदित्यराज, ६०% व्याज!

भाग्यनगरमध्ये गुंतवणूक कंपनीच्या कार्यालयावर छापा, दुसरी कंपनी रडारवर

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : महिना तीन टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची रक्कम जमवणारा शिवानंद नीलण्णावर याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता अशाच प्रकारची दुसरी कंपनी जिल्हा व पोलिस प्रशासनाच्या रडारवर आली आहे. भाग्यनगरमधील आदित्यराज कॅपिटल्स असे कंपनीचे नाव असून, गुरुवारी (दि. ४) कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. दिवसभर कागदपत्रांची तपासणी सुरू होती. केपीआयडी व बड्‌स ॲक्टअंतर्गत ही चौकशी सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

बलराज माने हे कंपनीचे संस्थापक व सीईओ आहेत. ते बेळगावात सध्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन आठवड्यांपूर्वी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच शिवम असोसिएट्ससारख्या आणखी चार कंपन्यांवर नजर असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार गुरुवारी आदित्यराजची चौकशी सुरू झाली.

शिवम् असोसिएट्‌ससारखी एक कंपनी भाग्यनगरमध्ये कार्यरत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रांताधिकारी श्रवण नायक यांना कंपनीच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास प्रशासन अधिकारी तसेच पोलिस अधिकाऱ्यांचा ताफा कंपनीच्या कार्यालयात गेला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कायार्लयातील कागदपत्रांची तपासणी सुरु केली. दिवसभर तपासणी तसेच संगणकीय माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू होता. कंपनीची वेबसाईट बंद असल्याने माहिती मिळण्यात अडचण येत होती.

छापा पडल्याचे लक्षात येताच बेळगावातील गुंतवणूकदारांसह बघ्यांनी भाग्यनगरमधील कंपनी कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. महिना पाच टक्के परतावा देण्याचे सांगून या कंपनीने कोट्यवधी रुपयांची रक्कम जमवल्याचा संशय आहे. शिवम असोसिएट्‌सनंतर आता पुन्हा एक कंपनीची चौकशी सुरू होणार असल्याने अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT