बेडकिहाळ : बेडकिहाळसह चांदशिरदवाडमधील जागृत दैवत विठ्ठल-बिरदेव व लक्ष्मीदेवीची विशाळी स्नान पालखी यात्रा भंडाऱ्याच्या उधळणीत व ढोल वादनाच्या गजरात भक्तिमय वातावरणात नुकतीच पार पडली. यावेळी ‘विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’ असा अखंड गजर करण्यात आला.
बेडकिहाळ रामनगरमधील मंदिरात पहाटे देवऋषी नागप्पा कोरे, मायाप्पा कोरे, विठ्ठल कोरे यांच्या हस्ते समाजातर्फे अभिषेक, महापूजा करण्यात आली. सकाळी विठ्ठल-बिरदेव पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. दूधगंगा नदीवरीलकट्ट्यावर श्रींच्या पालकाचे आगमन झाले. देवर्षी नागाप्पा कोरे, बाळू मेटकर, सांवता कोरे यांच्यासह धनगर समाजातील भाविक दूधगंगा नदीत महापूजेसाठी व विशाळी स्नान पूजेसाठी उतरले.‘काशीलिंगच्या नावाने चांगभलं’च्या जयघोषात दूधगंगा नदी पूजन करुन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. पूजा होताच शेकडो भाविकांनी दूधगंगा नदीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर भाकणुकीचा कार्यक्रम झाला. नदीवर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नदी परिसरातील बेडकिहाळ विठ्ठल-बिरदेव पालखी व चांदशिरदवाड येथील विठ्ठल-बिरदेव पालखी ग्रामदैवत चांदपीर दर्गाहमध्ये जाऊन गाठी-भेटीसह दर्शनाचा कार्यक्रम पार पडला. दुपारी दूधगंगेच्या पुलावर चांदशिरदवाडमधील विठ्ठल-बिरदेव, महालक्ष्मी पालखीचे आगमन होताच बेडकिहाळमधील विठ्ठल-बिरदेव पालखीसह इतर पालख्यांचे ढोलवादनाच्या निनादात आणि भंडाऱ्याच्या उजळणीत शेकडो भाविकांच्या उपस्थितीत गाठी-भेटीचा लक्षणीय कार्यक्रम झाला. दुपारी बेडकिहाळ येथील जुना बस्थानक परिसरातील कट्ट्यावर पालखीचे आगमन झाले. याठिकाणी आंबिल नैवेद्य करून बाजारपेठमार्गे पालखी मिरवणूक मंदिरापर्यंत काढण्यात आली. पालखी मंदिर प्रदक्षिणा घालून केळी शिकरणीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. रात्री व्यंकटेश्वरा साखर कारखाना परिसरातील बिरेश्वर मंदिराला भेट देत महाप्रसादाने विशाळी पालखी उत्सवाची सांगता झाली. यावेळी ममदापूरचे बाळासाहेब कदम, चंद्रकांत डोणे, अशोक घाटगे, जनगौडा धड्ड-पाटील, म्हाळू कोरे, ग्रा. पं. सदस्य सचिन पाटील यांच्यासह ग्रा. पं. सदस्य, मान्यवर व भाविक उपस्थित होते.