बेडकिहाळ : गळतगा मार्गावर व्यंकटेश्वरा साखर कारखान्यापासून थोड्या अंतरावर गेल्या 10 वर्षांपासून असलेल्या रुबिया हायटेक पोल्ट्री फार्मला शुक्रवारी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत पोल्ट्री फार्ममधील 15 दिवसांची सुमारे 30 हजार पिले, औषध, शेड, पिलांचे खाद्य, शेडभोवती असलेली प्लास्टिक ताडपत्री, शेडवरील पत्रे आगीत जळून खाक झाले आहेत. त्यामुळे सुमारे 1 कोटीवर रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पोल्ट्री बेडकिहाळ येथील ताजुद्दीन सिकंदर मुल्ला यांच्या मालकीची आहे. शेडवर काम करत असलेले लोक जेवणासाठी गावात आले होते. पोल्ट्री फार्मला आग लागल्याची माहिती मुल्ला यांना समजताच सर्वजण घटनास्थळी धाव घेतले; पण आग वाढल्याने पिलांना वाचवता आले नाही.
आग विझविण्यासाठी व्यंकटेश्वरा साखर कारखान्यासह सदलगा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. शनिवारी सकाळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, ग्रा. पं. अध्यक्ष शिवानंद बिजले, सदस्य प्रमोदकुमार पाटील, तलाठी एस. एन. नेम्मान्नावर यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. गळतगा येथील सरकारी पशुवैद्य अधिकारी डॉ. प्रशांत उदगट्टी, सदलगा पोलिस ठाण्याचे जी. ए. मुजावर, सहायक पी. के. कुंभार, आर. आर. तळवार यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.