बेळगाव : भाग्यनगरमधील इंडियन बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेले दागिने चोरणारा कंत्राटी बँक कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रकांत बालाजी जोर्ली (वय 32) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 14 लाखांचे दागिने जप्त करून गुन्हा दाखल केला. टिळकवाडी पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भाग्यनगर दुसरा क्रॉस येथे इंडियन बँकेची शाखा आहे. येथे लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांचे एक पाकीट चोरीला गेले होते. बँक व्यवस्थापकांनी टिळकवाडी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्याचा तपास निरीक्षक परशुराम पुजेरी यांच्याकडून सुरु होता. तपासाअंती बँकेतील एका कर्मचार्याने हे दागिने चोरल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्याकडून 144 ग्रॅमचे दागिने जप्त केले. यामध्ये सात लाख रुपये किंमतीच्या 24 कॅरेटसह हिरेजडीत तीन अंगठ्या, 60 हजाराची सोनसाखळी, दीड लाखाचे नेकलेस व साडेचार लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र आहे.
चंद्रकांत हा बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून अर्धवेळ काम करत होता. त्याला लॉकरसाठी येणार्या ग्राहकांसोबत चावी घेऊन पाठवले जात होते. ग्राहकासोबत गेला असता त्याने एका लॉकरमधील दागिन्यांचे पाकीट उचलले असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस आयुक्त भूषण बोरसे, डीसीपी रोहन जगदीश, निरंजनराजे अर्स, खडेबाजारचे एसीपी शेखराप्पा एच यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पुजेरी, उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ, उपनिरीक्षक प्रभाकर डोळ्ळी यांच्यासह महेश पाटील, एस. एम. करलिंगण्णावर, लाडजीसाब मुल्तानी, नागेंद्र तळवार, अरुण पाटील, नवीनकुमार जी. यांनी ही कारवाई केली.