बंगळूर : हत्तींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकात मानव-हत्ती संघर्षही वाढत चालल्याचे दिसून येत आहे. २०२३-२४ वर्षात राज्यात हत्तींच्या हल्ल्यात किमान ४८ लोकांना प्राण गमवावे लागल्याचे आढळून आले आहे. याच काळात विजेच्या धक्क्याने हत्तींचा मृत्यू होण्याच्या बाबतीत (१३ प्रकरणे) राज्य देशात दुसऱ्या स्थानावर आहे. याबाबत ओडिशा १५ प्रकरणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
२०२३ मध्ये वाघाशी संबंधित मानवी मृत्यू प्रकरणांमध्येही कर्नाटक आघाडीवर असून आठ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, जानेवारी ते जून २०२४ या काळात अशा प्रकरणांमध्ये घट झाल्याचे दिसून आले असून केवळ एक प्रकरण उघडकीस आले आहे, अशी माहिती केंद्रीय वन व पर्यावरण राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी नुकतीच संसदेत दिली. कर्नाटकात २०१९-२० ते २०२३-२४ या काळात हत्तींच्या हल्ल्यात १६० लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, २०२३-२४ या काळात शिकार, विषप्रयोग किंवा रेल्वेच्या धडकेत एकाही हत्तीचा मृत्यू झाला नाही. तसेच विजेच्या धक्क्याने १३ हत्ती मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही आधीच्या वर्षाच्या तुलनेत दोनने कमी आहे. विजेच्या धक्क्याने हत्तींचा मृत्यू होण्याची बहुतांश प्रकरणे मळ्यांच्या परिसरातच घडली आहेत.
२०२३-२४ मधील हत्तींच्या हल्ल्यातील बळी : ४८
विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेले हत्ती : १३
गेल्या पाच वर्षातील हत्तींनी घेतलेले बळी : १६०
२०२३ मध्ये वाघाशी संबंधित झालेले मृत्यू : ८