बंगळूर : राज्यातील दावणगिरी व बागलकोट विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला गड राखला असून, या निवडणुकीत काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. बागलकोट मतदारसंघातून काँग्रेसचे उमेश मेटी तर दावणगिरी मतदारसंघातून काँग्रेसचेच समर्थ शामनूर हे विजयी झाले आहेत. विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान, समर्थ शामनूर यांनी दावणगिरी दक्षिण विधानसभा मतदार संघ निवडणूक जिंकून पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश केला आहे. दिवंगत शामनूर शिवशंकरप्पा यांच्या कुटुंबाची तिसरी पिढी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आली आहे. या मतदारसंघात चुरशीची निवडणूक झाली होती. अटीतटीच्या लढतीत त्यांनी भाजपचे उमेदवार टी. श्रीनिवास दासकरियप्पा यांच्याविरूद्ध ५ हजार ७०८ मताधिक्क्याने विजय मिळवला.
या मतदारसंघात मतमोजणी सुरू झाल्यापासून भाजप उमेदवार 9 फेऱ्यांपर्यंत आघाडीवर होता. पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार टी. श्रीनिवास दासकरियप्पा यांना ३ हजार ७११ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार समर्थ शामनूर यांना ३ हजार १३४ मते मिळाली होती. अशाप्रकारे 9 व्या फेरीपर्यंत टी. श्रीनिवास आघाडीवर होते. मात्र, नवव्या फेरीनंतर काँग्रेसचे उमेदवार समर्थ शामनूर यांनी ३० हजार ५३० मते मिळवून आघाडी घेतली. भाजपचे उमेदवार टी. श्रीनिवास दासकरियप्पा यांना २६ हजार ५४४ मते मिळाली.
त्यानंतर हे अंतर जवळपास १९ व्या फेरीपर्यंत कायम राहिले. शेवटच्या २० व्या फेरीत शामनूर यांनी ५ हजार ७०८ मतांची आघाडी घेत विजय मिळविला. बागलकोट मतदारसंघातील निवडणुकीत उमेश मेटी विजय संपादन करत वडील दिवंगत एच. वाय. मेटी यांचे राजकीय उत्तराधिकारी बनले. उमेश मेटी २१ हजार ८६६ मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार उमेश मेटी यांना ९७ हजार ९४१ मते मिळाली, तर भाजपचे वीरण्णा चरंतीमठ यांना ७६ हजार ७५ मते मिळाली आहेत. एच. वाय. मेटी यांच्या निधनामुळे याठिकाणी पोटनिवडणूक झाली.