बेळगाव : महापालिकेने शहर व उपनगरातील गटारी मोकळ्या करुन पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केली. मात्र, पावसाळा सुरु झाला तरी बळ्ळारी नाल्यातील गाळ व जलपर्णी हटविण्याचे काम हाती घेतले नव्हते. शेतकर्यांनी शेतकर्यांनी बळ्ळारी नाल्यातील गाळ व जलपर्णी काढण्याची मागणी लावून धरली होती. अखेर महापौर व उपमहापौरांनी केलेल्या पाहणी दौर्यानंतर गुरुवारी (दि. 26) दुपारी बळ्ळारी नाल्यातील जलपर्णीसह गाळ हटविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले.
दरवर्षी पावसाळ्यात बळ्ळारी नाल्याला पूर येऊन आजूबाजूची हजारो एकर शेती पाण्याखाली जाते. शिवारात पाणी फुगून पिकांचे मोठे नुकसान होते. बळ्ळारी नाल्याचे पाणी यरमाळ रोड, केएलई रुग्णालय, धामणे रोड, बायपास रोडपर्यंत येऊन पोचते. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा ही समस्या उद्भवली आहे. गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर आला असून शेती पाण्याखाली गेली आहे.
या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी समिती नेमण्यात यावी. नाल्याचील गाळ काढून अतिक्रमणे हटवावीत. तसेच पीक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून नेहमी केली जाते. मात्र, त्याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. यंदाही शेतकर्यांना तोच अनुभव आला.
अखेरीस गुरुवारी महापौर मंगेेश पवार व उपमहापौर वाणी जोशी यांनी नाल्याची पाहणी केल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने नाल्यातील गाळ व जलपर्णी हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे, शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.