चिकोडी : कर्नाटकातील चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील बागेपल्ली तालुक्यात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या दोन पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये फर्हानाझ ही महिला आणि तिचा मुलगा मोहम्मद फर्दीन खान यांचा समावेश असून, दोघेही मूळचे पाकिस्तानचे रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्हानाझ हिने बागेपल्ली येथील रहिवासी अयुब खान यांच्याशी विवाह केला होता. अयुब खान सध्या एका आखाती देशात बस चालक म्हणून कार्यरत आहेत. या दांपत्याला चार मुले असून, त्यापैकी तीन मुले आणि अयुब खान भारतीय नागरिक आहेत. मात्र, फर्हानाझ आणि तिचा मुलगा मोहम्मद फर्दीन खान हे पाकिस्तानी नागरिक आहेत.
दोघांच्याही भारतातील व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते देशात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे तपासात उघड झाले. याशिवाय, आपण पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती लपवून त्यांनी भारतीय मतदार ओळखपत्र (Voter ID) आणि रेशन कार्ड (Ration Card) मिळविल्याचेही समोर आले आहे. भारतीय नागरिकत्व नसताना अशी अधिकृत कागदपत्रे मिळविणे हा कायद्याने गुन्हा असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
बागेपल्लीच्या तहसीलदार मनीषा एन. पत्री यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे रेशन कार्ड रद्द केले असून, संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदार ओळखपत्रही रद्द केले आहे. चिक्कबळ्ळापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुशल चोक्से यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय न्याय संहिता (BNS), विदेशी नागरिक कायदा (Foreigners Act) तसेच लोकप्रतिनिधी कायद्यान्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या दोघांना भारतीय ओळखपत्रे मिळवून देण्यासाठी कोणी मदत केली, कोणत्या माध्यमातून ही कागदपत्रे तयार करण्यात आली आणि यामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.