बंगळूर : राज्यात सर्वाधिक मोठा जिल्हा असणार्या बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून दोन किंवा तीन जिल्हे करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. आता अथणीला जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी समोर आली आहे. आमदार प्रकाश हुक्केरी यांनी शुक्रवारी (दि. 21) विधान परिषदेत ही मागणी केली.
आ. हुक्केरी हे 2025-26 च्या अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये भाग घेऊन बोलत होते. अथणी तालुका सीमेवर आहे. या भागातील लोकांना शासकीय व इतर कामांसाठी 190 कि. मी. अंतर कापून बेळगावला जावे लागते. यामध्ये त्यांचा वेळ, पैसाही खर्च होतो. अथणीला जिल्ह्याची मान्यता दिली, तर त्याचा फायदा केवळ अथणीच नव्हे, तर आसपासच्या तालुक्यांतील लोकांनाही होणार आहे. अथणीतील काही संघटना जिल्ह्याच्या दर्जासाठी आंदोलन करत आहेत. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आ. हुक्केरी यांनी केली.