निपाणी : निपाणीचे हार्ट ऑफ द सिटी म्हणून अशोकनगर ओळखले जाते. या नगरातील सर्व्हे नंबर 73 व 74 मधील 43000 स्क्वेअर फूट खुली जागा नगरपालिकेला मिळावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हायकोर्टात खटला सुरू होता. मात्र, चार दिवसांपूर्वी पालिका आयुक्त दीपक हरदी यांनी कोणालाही विश्वासात न घेता हायकोर्टातून खटला मागे घेतला आहे.
या त्यांच्या परस्पर निर्णयाविरोधात नगराध्यक्षांच्या सहीने पुन्हा हायकोर्टात खटला लढवणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी पत्रकारांना दिली. यावेळी बाळासाहेब देसाई सरकार, सभापती डॉ. जसराज गिरे यांची उपस्थिती होती.
गाडीवड्डर म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून अशोकनगरमधील जागेचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित होता. परंतु चार दिवसांपूर्वी कोणालाही सूचना अथवा माहिती न देता आयुक्त दीपक हरदी यांनी सदर खटला चालवण्यासाठी कोणालाही स्वारस्य नसल्याने हा खटला माघार घेतली असल्याचे सांगितले आहे. याबाबत आयुक्तांनी कोणतेही स्पष्ट कारण सांगितले नाही. आपणावर दबाव होता असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र कोणाचा दबाव आहे हेही सांगण्यास त्यांनी नकार दिला.
सध्या अशोकनगर येथील जागा 8 ते 10 हजार स्केअर फूट दराने विकली जात आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये किमतीची जागा पालिका सोडून देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी काळात हा खटला कोणी मागे घ्यायला लावला याची शहानिशा करून रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही विलास गाडीवड्डर यांनी दिला. कागदोपत्री 51800 स्क्वेअर फुटाची जागा प्रत्यक्षात 43000 स्क्वेअर फुट आहे. नगराध्यक्षांच्या सहीने पुन्हा खटला लढवता येतो. याला नगराध्यक्ष सोनल कोठडीया यांनी मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले.
यासंदर्भात नगराध्यक्षा सोनल कोठडीया यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता पालिका आयुक्तांनी खटला मागे घेतल्याची कोणतीही माहिती आपणास नसल्याचे स्पष्टीकरण दिले. आपण शहराच्या प्रथम नागरिक आहात. त्यामुळे पालिकेच्या कारभाराबाबत आपणास माहिती कशी नाही असे विचारले असता त्यांनी याबाबत माहिती करून घेऊन सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले जाईल, असे सांगितले.