बेळगाव ः गावोगावी फिरुन वंशावळ सांगणाऱ्या हेळवी समाजातील महिलेची विषारी द्रव पाजून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हेळवी समाजाची काही ठिकाणी घरेही आहेत. तर काही ठिकाणी झोपडी बांधून ते राहतात. आरगमध्ये नेऊन विषारी द्रव पाजून तेथेच दहन करण्यामागे पुरावे नष्ट करणे, हेच कारण असल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यांनी बुधवारी (दि. 15) पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, 10 एप्रिल रोजी सातेव्वा संतोष हेळवी ही 24 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद तिचा प्रियकर कृष्णा पाटीलने संकेश्वर पोलिसात दिली होती. ती बेपत्ता झाल्याची फिर्याद रायबाग येथेही दिली होती. तत्पूर्वी काही निनावी पत्राद्वारेही सदर महिलेचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याचा तपास करताना यमकनमर्डी ठाण्याचे निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्यासमोर काही बाबी आल्या. आधी सदर महिलेला तिच्या घरच्यांनी शिरोळला नेले. तेथे आठ दिवस समजावून सांगूनही ती काहीच ऐकत नव्हती. त्यामुळे, तिला आरगच्या माळरानावर नेऊन आधी विषारी द्रव पाजले त्यानंतर तिचे तेथेच दहन केले.
आरगमध्ये अंत्यसंस्कारावेळी तिच्या घरच्यांची खूपच गडबड सुरु होती, असे स्थानिकांचे म्हणणे होते. रक्तदाब कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे सांगत अंत्यसंस्कार उरकण्यात आले. परंतु, मुशापुरी यांनी मृत महिलेच्या आईकडून माहिती घेतली असता त्या गोंधळल्या. त्यामुळे, त्यांना घेऊनच पोलिस पथक आरग येथे गेले. कसून चौकशी केली असता तिचा खून केल्याचे स्पष्ट झाले.
आरगला नेऊन अंत्यसंस्कार करण्यामागचे कारण विचारले असता संशयितांनी सांगितले की, आपण कोणत्याही गावच्या माळरानावर झोपडी बांधून राहतो. हुक्केरी तालुक्यातील नदीगुडी क्षेत्र येथे, शिरोळ येथे तसेच अन्यत्र आपली पक्की घरे आहेत. पक्के घर आहे तेथे असे काही केल्यास संशय येईल, यासाठीच आरगला नेऊन अंत्यसंस्कार केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.