मधुकर पाटील
निपाणी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली येथील हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेची शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मानकरी, पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात सांगता झाली. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असणाऱ्या या यात्रेत नाथांचे विविध धार्मिक विधी, ढोलवादन, वालंग, गजीनृत्य, बकरा खेळवणे आदी पारंपरिक कार्यक्रम पार पडले.
बुधवारी पहाटे नाथांची पहिली व गुरुवारी पहाटे दुसरी भाकणूक ज्येष्ठ भाकणूककार भगवान डोणे महाराज (वाघापूरकर) यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे महाराज यांनी कथन केली; तर घुमट मंदिरात तिसरी व अखेरची भाकणूक भगवान डोणे महाराज यांनी स्वतः वर्तवली. गेल्या पाच दिवसांत या यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्रासह देशभरातून लाखांवर भाविकांनी हजेरी लावली होती. खडक मंदिरात शुक्रवारी पहाटे ४ ते ६ या वेळेत दुसरी, तर घुमट मंदिरात सकाळी ९.२५ ते ११.३० दरम्यान तिसरी भाकणूक झाली.
गुरुवारी दिवसभर महानैवेद्याचा कार्यक्रम झाला. शुक्रवारी सकाळी घुमटातील भाकणूक झाल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता भाकणूककार डोणे पिता-पुत्रांच्या हस्ते 'कर' तोडून यात्रेची अधिकृत सांगता करण्यात आली. तत्पूर्वी वालंग कार्यक्रम संपन्न झाला. सायंकाळी ५.३० वाजता उत्सवस्थळी ढोलवादन आणि अखंड भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. त्यानंतर नाथांच्या दोन्ही पालख्यांची व सबिना सोहळ्याची हालसिद्धनाथ आणि श्री महालक्ष्मी मंदिराभोवती प्रदक्षिणा झाली.
सायंकाळी ७ वाजता वाड्यातील मंदिरात नाथांची मूर्ती स्थानापन्न झाली; त्यानंतर कुर्ली येथील पालखी सोहळा गावाकडे मार्गस्थ झाला. यात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, पुजारी, मानकरी व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.
काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या हालसिद्धनाथांच्या भाकणुकीला या यात्रेत अनन्यसाधारण महत्त्व असते. नाथ आपल्या भाकणुकीतून दरवर्षी भक्तांना सावध करून भविष्यातील घडामोडींचे कथन करतात, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. यंदा सलग सहाव्या वर्षी भगवान डोणे महाराज यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे महाराज (वय २४) यांनी भाकणूक कथन केल्याने भाविकांमध्ये याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
यात्रेच्या सांगतेपूर्वी खडक मंदिरात पहाटे झालेल्या दुसऱ्या भाकणुकीत सिद्धार्थ डोणे महाराज यांनी "ज्वालामुखीचा उद्रेक होईल," असा इशारा दिला. तर घुमट मंदिरात झालेल्या तिसऱ्या भाकणुकीत भगवान डोणे महाराज यांनी "हालसिद्धनाथांची पुण्यभूमी सदैव पवित्र राहील," असे भाष्य करत भाविकांना दिलासा दिला.
यात्रेनिमित्त कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांतील भाविकांनी भाकणूक ऐकण्यासाठी व दर्शनासाठी आप्पाचीवाडीत गर्दी केली होती. यंदा भाविकांचा अथांग महापूर लोटल्याने यात्रेने उपस्थितीचे सर्व जुने विक्रम मोडले.