मधुकर पाटील
निपाणी : श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी पहाटे ४ ते ६ या वेळेत श्री हालसिद्धनाथांची पहिली भाकणूक झाली. वाघापूरचे प्रमुख मानकरी भगवान डोणे (महाराज) यांच्या उपस्थितीत त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे (महाराज) यांनी नाथांच्या साक्षीने भाकणूक कथन केली. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या यात्रेचा आज मुख्य दिवस असल्याने भाविकांनी दर्शन, नैवेद्य आणि श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतले. उद्या शुक्रवार दि. ३० रोजी सायंकाळी खडक मंदिर येथील उत्सवस्थळी पालखी उठल्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे.
या भाकणुकीत देशात दुष्काळ पडून नदीनाले कोरडे पडतील, पाण्यासाठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल आणि पाणी मिळवण्यासाठी पाळी लावावी लागेल, असे नवे भाकीत नाथांनी वर्तवले. शिवाय जगातील तापमानवाढ, तिसऱ्या महायुद्धाचा धोका, निष्पाप नागरिकांचे बळी, नैसर्गिक आपत्ती आणि रोगराई यांचाही उल्लेख करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना बदलत्या पर्जन्यमानाचा सामना करावा लागेल; नदीकाठच्या जमिनी ओसाड पडतील, तर उसाच्या भावासाठी राज्याराज्यांत आंदोलने होतील, असेही नाथांनी सांगितले.
तसेच कर्नाटकातील जलाशयाला भगदाड पडणे, देशात जातीय तणाव निर्माण होणे, महागाई वाढणे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरता येणे आणि इंधनासह विविध वस्तूंच्या किमती वाढणे, अशा संभाव्य संकटांचा उल्लेख या भाकणुकीत करण्यात आला. दुसरीकडे कडधान्यांचे उत्पादन चांगले होईल, काही पिकांना अनुकूल परिस्थिती राहील तर उसाचा भाव वाढत राहील, अशी आशादायक भाकितेही व्यक्त करण्यात आली.
यामध्ये सीमाप्रश्न, राजकीय घडामोडी, सामाजिक संघर्ष, नैसर्गिक आपत्ती आणि बदलते ऋतूमान यांचाही समावेश होता. पाऊस, शेतीमालाचे उत्पादन आणि बाजारभाव याबाबतच्या या कथनामुळे शेतकरी वर्गात भाकणुकीची मोठी चर्चा सुरू आहे.
भारतासह जगासमोर पाणीटंचाई, दुष्काळ आणि तापमानवाढीचे संकट उभे राहील; मनुष्याला १८ तऱ्हेचे आजार होतील, तर उसाच्या काकवीपासून औषधनिर्मिती होईल. जंगलतोड, पाण्याचा अपव्यय आणि पर्यावरणाचा बिघडलेला समतोल यांमुळे भविष्यात पाण्याची समस्या अधिक गंभीर होईल. जागतिक तणावामुळे युद्धाचा धोका वाढून सामान्य नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. या पार्श्वभूमीवर पाणीबचत, पर्यावरणसंवर्धन, शांतता आणि आरोग्याविषयी जागरूकता ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित होते.
आखाती देशांतील तणावाचा जागतिक इंधन बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील अस्थिरतेमुळे तेल आणि वायूच्या वाहतुकीबाबत चिंता निर्माण होऊ शकते. भारतासारख्या आयातदार देशासाठी इंधनाचे दर, वाहतूक खर्च आणि औद्योगिक उत्पादन महत्त्वाचे ठरले आहे. मागील भाकणुकीतील उल्लेखांशी सध्याच्या घडामोडींची तुलना केली जात असल्याने ही भाकणूक खरी ठरल्याचा निष्कर्ष भाविकांतून काढला जात आहे.
बदलते पर्जन्यमान, अनियमित पाऊस आणि तापमानातील चढ-उतार यांचा शेतीवर परिणाम होऊ शकतो. पावसाचे प्रमाण कमी किंवा अधिक झाल्यास खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भाकणुकीत पावसाच्या अनिश्चिततेचा आणि पिकांच्या उत्पादनातील बदलांचा उल्लेख करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आगामी पावसाकडे व बाजारभावाकडे लागले असून, त्यांची चिंताही वाढली आहे.
यंदा सहाव्या वर्षी भगवान डोणे (महाराज) यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे (महाराज) यांनी पहिली भाकणूक कथन केली. गुरुवारी पहाटे ४ ते ६ या वेळेत लयबद्ध सुरात भाकणूक पूर्ण झाली. दरवर्षी सुमारे अडीच तास चालणारी भाकणूक यंदा मात्र दोन तासांत आटोपली. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेशातून भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, यात्रेकरूंच्या सोयीसाठी यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीने योग्य नियोजन केले असून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.