बेळगाव: लम्पीबरोबर इतर कोणत्याही कारणाने मृत्यूमुखी पडणाऱ्या पशूधनाला आर्थिक मदत मिळणार आहे. अनुग्रह योजनेअंतर्गत पशुपालकांना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना या योजनेचा आधार मिळणार आहे.
लम्पीबरोबर इतर कोणत्याही कारणाने गाय म्हैस किंवा बैलाचा मृत्यू झाल्यास अनुग्रह योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये तर शेळ्या मेंढ्याचा मृत्यू झाल्यास 7500 हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. जिल्ह्यात लम्पीमुळे गाय-बैलांचा म्हणजेच गोवर्गीय जनावरांचा मृत्यू होत आहे, हे प्रमाण कमी असले तरी पशुपालकांना फटका बसू लागला आहे. अशा परिस्थितीत जनावर दगावलेल्या मालकाला अनुग्रह योजनेअंतर्गत मदत दिली जाते. मात्र याबाबत पशूपालक अनभिज्ञ असल्याने या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. यासाठी पशूपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाउन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशूसंगोपन खात्याने केले आहे.
दोन वर्षांपूर्वी लम्पीने जिल्ह्यातील पंचवीस हजार जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पशूपालकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. दरम्यान बैलासाठी 30, गाईला 20 तर लहान वासराला दहा हजाराची मदत दिली होती. त्याप्रमाणे आता देखील अनुग्रह योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त पशुपालकांना मदत मिळणार आहे. ग्रामीण भागात दुर्दैवी घटना विशेषत: ग्रामीण भागात विविध ठिकाणी दुर्दैवी घटना असतात,पूर, वीज, भूकंप, विषबाधा आणि इतर कारणामुळे पशुधनाचा मृत्यू होतो. अशा नुकसानग्रस्त पशुपालकांना अनुग्रह योजनेअंतर्गत मदत होणार आहे. मात्र जनावर मृत्यूमुखी पडल्याची माहिती जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात देणे, बंधनकारक आहे. त्यानंतर रितसर पंचनामा होउन अहवाल पुढे पाठविला जातो. आणि संबंधित नुकसानग्रस्ताला मदत दिली जाते.
बऱ्याचदा अतिपावसाच्या परिस्थितीत जनावरांच्या अंगावर वीज कोसळणे, शेळ्या-मेंढ्या पुराच्या पाण्यात वाहून जाणे अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान होते. अशा परिस्थितीतही ही योजना पशुपालकांना आधार ठरणार आहे.