चिकोडी : २०२८ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करून पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेत आणले जाईल, असा विश्वास अ. भा. काँग्रेस समितीच्या सरचिटणीस (एआयसीसी) माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केला.
चिकोडी जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, काँग्रेस सरकारने लागू केलेल्या 'पंच हमी' योजना आणि विकासकामांवर विश्वास ठेवून इतर पक्षांतील नेते काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक असतील तर त्यांचे स्वागत केले जाईल. राज्यात सुरू असलेला एसआयआर प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन प्रत्येक गावातील नागरिकाला मदत करावी. मतदानाचा हक्क प्रत्येकाला मिळावा, यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
आमच्या पक्षात काही नेत्यांकडे दोन पदे आहेत, अशा नेत्यांची माहिती हायकमांड घेत आहे. तसेच पक्षासाठी एकनिष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना महामंडळांवर (निगम मंडळ) पदे देण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे कार्यकर्त्यांची यादी तयार करत आहेत. लवकरच पात्र कार्यकर्त्यांना ही पदे दिली जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
एसआयआरसंदर्भात नाराजी व्यक्त करत त्या म्हणाल्या, बीएलओनी सर्व मतदारांच्या घरी भेट दिली पाहिजे. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मतदारांना 'एसआयआर'बाबत माहिती देऊन जागरूक करावे. चिकोडी जिल्ह्याला लवकरच मंत्रिपद मिळेल असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार गणेश हुक्केरी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, अर्जुन नाईकवाडी, अनिल पाटील, एच. एस. नसलापुरे, सिद्धार्थ शिंगे, सतीश कुलकर्णी, रामा माने, अनिल माने, रमेश पाटील नरेंद्र नेर्लीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.