अंकली : पाणी साठवणुकीच्या क्षमतेच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेले आणि उत्तर कर्नाटकाचे जीवनदायी मानले जाणारे विजापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील आलमट्टी धरण (लाल बहादूर शास्त्री सागर) यंदा गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक पाणीटंचाईचा सामना करत आहे. नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच धरणातील पाणीसाठा मोठ्याप्रमाणात घटल्याने आगामी उन्हाळ्यात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सन २०१५-१६ च्या उन्हाळ्यात जाणवलेल्या पाणीटंचाईपेक्षाही यंदाची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आलमट्टी धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ४७ टीएमसीने घट झाली आहे. एकूण ५१९.६० मीटर उंची आणि १२३ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या केवळ ५७.९७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये १७.६२ टीएमसी मृतसाठ्याचा समावेश असून प्रत्यक्ष वापरासाठी केवळ ४०.३५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.
गतवर्षी याकाळात धरणात मृतसाठा वगळता ९९.८१ टीएमसी तर एकूण १२२.८५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा महाराष्ट्रासह कर्नाटकातही पावसाचे प्रमाण तुलनेने कमी होते. कृष्णा खोऱ्यात झालेल्या पावसाबरोबरच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील बेळगाव, सांगली, कोल्हापूर, जत, महाबळेश्वर आणि कोकण प्रदेशात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे आलमट्टी धरणात एकेकाळी १.५५ लाख क्युसेकपर्यंत विक्रमी पाण्याची आवक झाली होती. त्यामुळे गत जुलै महिन्याच्या अखेरीस धरणातील पाण्याची पातळी ५१८.९० मीटरपर्यंत पोहोचली होती.
अवघ्या 3 महिन्यांच्या कालावधीत १२३ टीएमसी क्षमतेच्या धरणातील पाणीसाठा मोठ्याप्रमाणात घटला. तब्बल ६५.०३ टीएमसी पाणी नेमके कुठे आणि कशासाठी वापरले गेले, हा संशोधनाचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. आता पुढील मे २०२७ पर्यंत सुमारे ७ महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचे नियोजन कसे करायचे, असा गंभीर प्रश्न उत्तर कर्नाटकातील शेतकरी आणि नागरिकांसमोर उभा ठेपला आहे.
सध्या आलमट्टी धरणात ५७.९७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असतानाही वीज निर्मिती, कालवे आणि शेततळी, तलाव भरण्यासाठी तब्बल १७ हजार ९१७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विशेष म्हणजे अवघ्या ४ दिवसांत धरणातून तब्बल ५.९० टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गत रविवारी २० हजार ६५९ क्युसेक्स, ६ नोव्हेंबर रोजी २३ हजार ८६६ क्युसेक्स आणि ७ नोव्हेंबर रोजी २१ हजार ८०५ क्युसेक्स पाणी नदीपात्रात आणि कालव्यांमध्ये सोडण्यात आले होते. उन्हाळा सुरू होण्यास अद्याप ५ महिन्यांचा कालावधी असतानाच धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने फेब्रुवारी ते मे या कालावधीत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
अलमट्टी धरणात सध्या ५७.९७ टीएमसी पाणीसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ४७ टीएमसी पाण्याची कमतरता आहे. गतवर्षी याकाळात मृतसाठा वगळता ९९.८१ टीएमसी पाणी उपलब्ध होते. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने आणि आवश्यक तेवढाच करावा. अन्यथा आगामी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते.- श्वेता बेडीकर, उपविभागाधिकारी, जमखंडी