बंगळूर : अलमट्टी जलाशयाची उंची 524 मीटरपर्यंत वाढवण्यासाठी आणि आमच्या वाट्याचे पाणी वापरण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. यासंदर्भात बुधवार, दि. 7 रोजी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र, कर्नाटक तसेच आंध्र आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.
बंगळूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकारने 2010 च्या कृष्णा जलतंटा लवादच्या निकालानुसार राजपत्र अधिसूचना जारी करणे आवश्यक आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने या संदर्भात 7 रोजी चार राज्य सरकारच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. या मुद्द्यावर संबंधित मंत्र्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे. आम्ही या विषयावर कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. ते 2 दिवसांत त्यांचे याबाबत मत मांडतील. याआधारे आम्ही केंद्रीय मंत्रालयाच्या बैठकीत आमच्या मागण्या मांडू, असे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने यापूर्वी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. आंध्र आणि तेलंगणाला कितीही नफा किंवा तोटा झाला तरी चालेल. मात्र, जलाशयाची उंची 524 मीटरपर्यंत वाढवण्यात येईल. आम्ही त्यासाठी आवश्यक तेवढे प्रयत्न करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुलबर्गा येथे नीटदरम्यान विद्यार्थ्याचे जानवे काढण्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, सरकार आणि अधिकार्यांनी धार्मिक प्रथा आणि विचारांमध्ये हस्तक्षेप करू नये. केंद्र सरकारची ही कृती योग्य नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.