बंगळूर : कृष्णा जलतंटा लवादाच्या निकालानुसार, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करणार्या राज्य सरकारने महाराष्ट्राने दाखल केलेल्या तक्रारीला उत्तर म्हणून स्वतःचा अहवाल सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूर अलमट्टी धरणामुळे नव्हे, तर महाराष्ट्रातील नद्यांमुळेच निर्माण होत आहे, असा दावा कर्नाटक सरकारने केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना पत्र लिहून अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होईल, असे म्हटले आहे. यासंदर्भात सिंचन तज्ज्ञांच्या अहवालाद्वारे सत्य परिस्थिती समजावण्यासाठी अहवाल सादर करण्याची तयारी कर्नाटक सरकार करत आहेत.
महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या पूरतज्ज्ञ समितीच्या महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूर हे राज्यातील अलमट्टी आणि हिप्परगी जलाशयांमध्ये पाण्याच्या साठ्यामुळे नसल्याचे म्हटले आहे. या अहवालातील सत्य उघड करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने 2020 मध्ये महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली होती. समितीमध्ये सिंचनतज्ज्ञ संजय घाणेकर, आर. आर. पवार, प्रदीप पुरंदरे, अतुल कपोले, आर. डी. मोहिते, एस. एल. दयाफुले, एन. एस. खरे आणि धैर्यशील पवार यांचा समावेश होता.
समितीने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोर्याचा सहा महिन्यांचा अभ्यास केला. तज्ज्ञ समितीने अलमट्टीला भेट दिली, तेव्हा कृष्णा भाग्यजल निगम लिमिटेडच्या (केबीजेएनएल) अधिकार्यांनी महाराष्ट्राच्या अधिकार्यांना दरवर्षी आलमट्टी जलाशयात पाणी साठवण्याची पद्धत आणि घेतलेल्या खबरदारीच्या उपाययोजना समजावून सांगितल्या. तसेच, तांत्रिक घटकांवर आधारित पूर आल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. समितीने महाराष्ट्रातही अभ्यास केला आणि तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केला.
कर्नाटकातील जलाशय हे पुराचे कारण नाही. मुख्य कारण नदीपात्रावरील अतिक्रमण आणि इमारतींचे बेकायदेशीर बांधकाम आहे. याव्यतिरिक्त, पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडल्यानंतर लगेचच ओढे, तलाव आणि नद्या अचानक भरून वाहू लागल्याने पूर येतो, असे स्पष्ट करण्यात आले. या अहवालाच्या आधारे, कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
उंची वाढवणारच : एम. बी. पाटील
वादावर प्रतिक्रिया देताना उद्योगमंत्री एम. बी. पाटील म्हणाले की, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा मुद्दा आता बंद झाला आहे. लवादाने धरणाची उंची वाढवण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकार त्यानुसार कारवाई करेल. महाराष्ट्र सरकारच्या सिंचन तज्ज्ञांच्या समितीने महाराष्ट्र सरकारच्या पुराबाबतच्या आक्षेपांना उत्तर दिले असले, तरी तेथील सरकार अनावश्यक वाद निर्माण करत आहे.