जितेंद्र शिंदे
बेळगाव ः बरोबर आठवडाभरापूर्वीची गोष्ट ! आठ वर्षांनंतर सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर येणार होता. त्यासाठी प्रतिस्पर्धी कर्नाटककडून चहुबाजुंनी फिल्डिंग लावण्यासाठी आधी दीड महिन्यांपासूनच तयारी सुरु होती. इकडे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सीमा समन्वय मंत्री, तज्ज्ञ समिती अध्यक्षांना वारंवार पत्रे लिहित होते. तरी उच्चाधिकार समितीची बैठक झाली नाही. दाव्याची सुनावणी काही तासांवर असतानाही काही अडचणी निर्माण होण्याची भीती होती. अशावेळी अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय साहाय्यकाला फोन लावण्यात आला. त्याने वेगाने हालचाली करुन दाव्यासाठी आवश्यक असलेली तयारी सुरु केली. ही होती अजितदादा पवार यांची ओळख.
सीमावासियांचे कोणतेही काम मागे ठेवायचे नाही, हा इशारा अजित पवार यांनी सर्वच अधिकाऱ्यांना दिला होता. पण, बुधवारी (दि. 28) झालेल्या विमान अपघातामुळे हा कामाचा माणूस सीमावासियांना सोडून गेला. आमचा आधार तुटला, अशा भावना सीमाभागात व्यक्त होत आहेत. कणखर, स्पष्टवक्ते, फटकळ आणि कामाचा माणूस अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे सीमाभागातही मोठा शोक व्यक्त करण्यात येत आहे. अजित पवार यांना मराठी भाषेचे संवर्धन आणि सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी अव्याहतपणे लढा देणाऱ्या मराठी भाषिकांप्रती कळवळा होता. त्यामुळेच सीमाभागाशी असलेली त्यांची भावनिक वीण अचानक उसवली गेल्याची भावना सीमाभागातून व्यक्त होत आहे.
सीमावासियांबद्दल कळवळा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी शरद पवार यांनी नेहमीच मराठी भाषिकांची साथ दिली आहे. त्यांनी सक्रिय सहभागही नोंदवला होता. पण, त्यांच्याच राजकीय आणि सामाजिक तालमीत वाढलेल्या अजितदादांना सीमावासियांप्रती मोठा जिव्हाळा होता. सीमाभागातील मराठी माणसांवर अन्याय झाला की त्यावर अजितदादा महाराष्ट्रात आवाज उठवत असत. ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले, त्या 2009-10 मध्ये सीमाभागातील मराठी संस्थांना आर्थिक मदत घोषित केली. अर्थसंकल्पात तीन कोटी रुपयांची तरतूद केली. त्यामुळे, सीमाभागात होणारी अनेक साहित्य संमेलने, शैक्षणिक, सामाजिक संस्थांना मोलाचा आधार मिळाला.
भावनिक नव्हे तर रक्ताचे नाते
अजितदादा यांचे बेळगावशी केवळ भावनिकच नाही तर रक्ताचे नाते होते. त्यांच्या भगिनी नीमाताई माने या बेळगावात असतात. त्यामुळे, सार्वजनिक कार्यक्रमासाठी नसले तरी ते खासगी कार्यक्रमाशी बेळगावला येत असत. सीमाप्रश्न सुटावा, यासाठी लढणाऱ्या मराठी माणसांचे त्यांना फार कौतुक होते. गेल्यावर्षी नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांना मध्यवर्ती म. ए. समिती नेते आणि मराठी कार्यकर्ते भेटले. त्यांनी सीमावासियांची मागणी सविस्तर ऐकून घेतली आणि पुढील काही दिवसांत तज्ज्ञ समितीची पुनर्रचना झाली. एखादे सांगितले की होणार की नाही, हे तोंडावर सांगण्याचे धाडस अजितदादांकडे होते. त्यांच्या माध्यमातून सीमाभागातील अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांना आर्थिक मदत झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी चंदगडमध्ये प्रचारासाठी जाण्यासाठी अजित पवार बेळगाव विमानतळावर आले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली होती. सीमाप्रश्नी न्यायालयीन लढ्यात महाराष्ट्र मागे राहणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या कृतीतून ते दाखवतही होते. पण, त्यांच्या निधनामुळे सीमावासियांचा हा जिव्हाळ्याचा बंध तुटला गेला.