मधुकर पाटील
निपाणी : निपाणी तालुक्यासह पांढऱ्या पट्ट्यासाठी हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारा ऐतिहासिक काळम्मावाडी पाणी करार आजही सीमाभागातील वेदगंगा नदी काठावरील सुमारे 50 गावांतील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनाचा आधार ठरला आहे. या करारामुळे कोरडवाहू आणि दुष्काळी भागात पाणी पोहोचले आणि पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या शेतीच्या अर्थकारणाला नवे बळ प्राप्त झाले. या ऐतिहासिक करारासाठी निर्णायक भूमिका बजावणारे महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे योगदान निपाणी तालुक्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाईल.
काळम्मावाडीच्या पाण्यावरून महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील गुंतागुंतीच्या राजकीय व प्रशासकीय चर्चांना ठोस निर्णयाची दिशा देण्याचे काम अजित पवार यांनी केले. या संवेदनशील मुद्द्यावर कणखर भूमिका घेत,समन्वय साधत आणि राजकीय धैर्य दाखवत अजितदादांनी हा करार प्रत्यक्षात आणला. या करारामुळे कर्नाटकाला पाणी मिळाले आणि त्याचा थेट लाभ निपाणी तालुक्यासह सीमाभागातील शेतकऱ्यांना झाला. पांढऱ्या पट्ट्यातील शेतीला पाणी मिळाल्यामुळे रोजगारनिर्मिती झाली आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. या संपूर्ण प्रक्रियेत दिवंगत आ. काकासाहेब पाटील यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ मिळाली. त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीशिवाय हा करार शक्य झाला नसता, अशी भावना आजही शेतकरीवर्गातून व्यक्त केली जाते. काळम्मावाडी करार म्हणजे केवळ पाणीवाटपाचा करार नाही तर तो निपाणी तालुक्याच्या विकासाचा, समृद्धीचा आणि भविष्याचा पाया आहे.