बेळगाव

AI technology: ‘एआय’ वाचवतेय वन्यप्राण्यांचे प्राण

रेल्वे अपघात रोखण्यासाठी ‘आयआर डिटेक्टर’ प्रणाली : लोंढा वनक्षेत्रात कार्यान्वित

पुढारी वृत्तसेवा
वासुदेव चौगुले

खानापूर : वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वेमार्गांवर वन्यप्राण्यांचे रेल्वे अपघातात होणारे मृत्यू रोखण्यासाठी अत्याधुनिक इन्फ्रारेड (आयआर) डिटेक्टर आधारित सुरक्षा प्रणाली विकसित करण्यात आली आहे. लोंढा वन परिक्षेत्रातील तिवोलीवाडा आणि अकराळी या ठिकाणी सीएसआरमधून उपलब्ध झालेल्या २० लाखांपेक्षा अधिक निधीतून एआयद्वारे चालणारी ही स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या चार महिन्यात पाचवेळा गव्यांचे रेल्वेच्या धडकेपासून रक्षण झाले आहे. या प्रणालीद्वारे रेल्वे येण्यापूर्वीच वन्यप्राण्यांना रुळांपासून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

लोंढा वन परिक्षेत्रातून ३६ किलोमीटरची रेल्वेमार्ग गेला आहे. रेल्वेमार्गाच्या बाजूला जंगलात अनेक नाले आहेत. उन्हाळ्यात जंगलातील तलावांचे पाणी आटते. त्यामुळे तहान भागविण्यासाठी गवे व इतर वन्यजीव रेल्वेमार्गालगत असलेल्या नाल्यांच्या दिशेने येतात. सध्या लोंढा-मिरज रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण झालेले असल्याने दर अर्ध्या तासाला गाड्यांची ये-जा होत आहे. त्यामुळे, वन्यजीवांच्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्यासाठी लोंढ्याचे वनक्षेत्रपाल तेज वाय. पी. यांनी बारकाईने अभ्यास केला.

दोन महिने रेल्वेमार्गाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून विशेष लक्ष ठेवले. वन्यप्राण्यांची सर्वाधिक वर्दळ असणारी ठिकाणे आणि रेल्वेमार्ग ओलांडण्याच्या जागा शोधून काढल्या. तिवोलीवाडा आणि अकराळी या ठिकाणी रेल्वे मार्गावरील संभाव्य धोकादायक असा प्रत्येकी २०० मीटरचा कन्फ्लिक्ट झोन निश्चित करण्यात आला. त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन किलोमीटरचा बफर झोन बनविण्यात आला. बफर झोनमध्ये बसविण्यात आलेले आयआर डिटेक्टर येणाऱ्या रेल्वेची हालचाल ओळखतात आणि वायरलेस इंटरनेटच्या माध्यमातून माहिती कन्फ्लिक्ट झोनमधील यंत्रणेकडे पाठवितात.

रेल्वे जवळ आल्याचा इशारा मिळताच कन्फ्लिक्ट झोनमध्ये बसविण्यात आलेली ध्वनी व प्रकाश आधारित चेतावणी यंत्रणा (अलार्म) कार्यान्वित होते. कुत्र्याचे भुंकणे व वाघाच्या डरकाळीसह येणारे मोठे आवाज आणि चमकदार प्रकाश यामुळे वन्यप्राणी रुळांपासून बाजूला सुरक्षित अंतरावर जाण्यास प्रवृत्त होतात. त्यामुळे रेल्वे आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यास मदत होत आहे. कन्फ्लिक्ट झोनमध्ये दर ५० मीटर अंतरावर एआय टेक्नॉलॉजीवर आधारित स्वयंचलित कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

सोलरच्या माध्यमातून वीज पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. विशेषतः गवे, हत्ती, रानडुक्कर, हरीण व इतर वन्यप्राण्यांची वर्दळ असलेल्या जंगलपट्ट्यात ही प्रणाली प्रभावी ठरणारी आहे. वनखाते आणि रेल्वे प्रशासनाने अशा तंत्रज्ञानाचा वापर केल्यास वन्यजीव संरक्षणास मोठी चालना मिळेल, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT